शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) एका कार्यक्रमात बोलतान पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमास भाजपा नेते आशिष शेलार यांची देखील उपस्थिती होती. यावेळी या दोन्ही नेत्यांची शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली.
मुंबईत टीव्ही पत्रकारांच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला. यावेळी भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाप्रसंगी संजय राऊत बोलत होते.
“राजकारण अत्यंत चंचल असतं त्यापेक्षा बहुमताचा आकडा असतो, १४५ ची बेरीज हे दुसऱ्या पद्धतीने करू शकतात हे आपले संविधान आणि लोकशाही सांगते, एका चिडीतून हे सरकार झालं आहे, त्या चिडीत तेल टाकण्याचं काम करू नका. पण आता उपयोग नाही, हवेची दिशा बदललेली आहे, तीन वर्षे तीच रहाणार आहे, हवेची दिशा आम्ही बदलली आहे का ? ” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.
तसेच, “आपण राजकीय पातळी सोडून नको त्या विषयाकडे गेलो आहोत, जे बोलू नये ते बोलत आहोत, ज्या गोष्टी घडू नयेत त्या घडत आहेत, हे महाराष्ट्राचे राजकारण नाही. महाराष्ट्र टिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची कोर कमिटी असली पाहिजे.” असं संजय राऊत हे आशिष शेलार यांना उद्देशून बोलताना देखील यावेळी दिसून आलं.
याचबरोबर, त्रिपुरामधील हिंसाचाराच्या घटनेवरून राज्यातील काही शहरांमध्ये उफाळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “या राज्यात दंगल ही हिंदूंना परवडणार नाही आणि मुसलमानांनाही परवडणार नाही.”
तर, आज भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, “मघाशी देवेंद्र यांनी माझ्यावर टीका केली, म्हणजे माझं काम चांगलं चालू आहे, ही कामाची पावती आहे.” अशी शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली.