मुंबई : बारामती, रायगड, कोल्हापूरसह ११ मतदारसंघांमधील मतदानाची अधिसूचना आज, शुक्रवारी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज आज, शुक्रवारपासून दाखल करण्यात येणार असले तरी महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप की शिंदे गट लढवणार याचा निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर साताऱ्यातही भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांपैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीतील शिवसेना शिंदे गट लढणार की भाजप? हे अद्यापही निश्चित झालेले नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचार सभांमधून भाषणे सुरू केली असली तरी भाजपने त्यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावा सोडण्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोध दर्शविला आहे. कोकणातील या जागेचा तिढा शुक्रवारी किंवा शनिवारी सुटेल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.  सातारा मतदारसंघातून उमेदवारीसाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण भाजपने त्यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. उमेदवारी मिळणार हे गृहित धरून भोसले यांनी प्रचार सुरू केला आहे. राज्यसभेचे खासदार असल्याने उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात भाजपमध्ये आक्षेप आहे.

हेही वाचा >>>अजित पवारांना शरद पवारांचं खास शैलीत उत्तर, “बाहेरुन आलेला पवार..

माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झाला नव्हता. पण विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढण्याचे जाहीर केले. येत्या रविवारी ते अधिकृतपणे पक्षप्रवेश करणार आहे.

मतदान तपशील

’लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, सांगली, उस्मानाबाद, लातूर या ११ मतदारसंघांमध्ये मतदान.

’आज, १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यात प्रारंभ, १९ एप्रिल ही अंतिम तारीख.

’पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल, तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान.

’पहिल्या दोन टप्प्यांत विदर्भातील सर्व १० आणि मराठवाडय़ातील तीन मतदारसंघांत मतदान.

’१३ आणि २० मे या दोन टप्प्यांमध्ये उर्वरित २४ मतदारसंघांमध्ये मतदान.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dispute for two seats in the grand alliance is still ongoing amy