मुंबई: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांच्या विक्रीसाठी २४ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र आता ही सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे मंडळ क्षेत्रातील ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला इच्छुकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. अर्जविक्री-स्वीकृतीच्या अंतिम मुदतीत ६० हजार अर्ज दाखल झाले आहेत.
सोडतीच्या सुधारित वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. पण आता प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता इच्छुकांना गृहस्वप्नपूर्तीसाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.