मुंबई : प्रचारगीतामधील ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ शब्दांवरील आक्षेपाबाबत फेरविचार करण्याची शिवसेना ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. आयोगाने यापूर्वी घेतलेला निर्णय नियमानुसार असून आपण आक्षेपार्ह शब्द वगळण्याबाबत विचार करावा, अशी सूचना आयोगाने ठाकरे यांना केली आहे. आता यावर ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष असेल.
ठाकरे गटाच्या प्रचारगीतातील शब्दांवर आक्षेप घेत आयोगाच्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीने प्रमाणपत्र नाकारले. निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ शब्द वगळण्यास ठाकरे यांनी स्पष्ट नकार देत आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच या दोन्ही शब्दांबाबत फेरविचार करण्याची विनंतीही आयोगाला करण्यात आली होती. मात्र राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीने हा अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला. नियमानुसार मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मस्जिद किंवा कोणत्याही धार्मिक प्रार्थनास्थळाचा तसेच धार्मिक वाक्ये, चिन्ह, घोषवाक्य यांचा भित्तीपत्र, व्हिडीओ ग्राफिक, गाण्यात वापर करण्यास मनाई आहे. ठाकरे गटाप्रमाणेच अन्य ३९ प्रकरणांत आयोगाने आक्षेप घेतले आहेत. त्यापैकी १५ प्रकरणी संबंधित राजकीय पक्षांनी सुधारणा केल्या असून त्यांच्या प्रसिद्धी साहित्याला मान्यता देण्यात आली आहे. इतरांना मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही. समितीच्या निर्णयास कोणाला आक्षेप घ्यायचे असल्यास त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अपील करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निर्णय शिवसेनेच्या पथ्यावर?
काँग्रेसशी आघाडी करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप व शिंदे गटाकडून सातत्याने केली जाते. मात्र ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ या शब्दांवरून ठाकरे गटाला हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याची आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे हे दोन्ही शब्द मागे घेतले जाण्याची शक्यता नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. उलट मुंबई, ठाण्यातील निवडणुकीपर्यंत हा विषय चर्चेत ठेवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असेल.