मुंबई : रोषणाईचा झगमगाट आणि आनंदाची उधळण करत मुंबईतील विविध ठिकाणी ‘नाताळ’ चा उत्साह बुधवारी पाहायला मिळाला. मुंबई शहर व उपनगरातील विविध चर्च, मुख्य रस्ते, घरे आणि झाडांवर केलेल्या रोषणाई व सजावटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध चर्चमध्ये मंगळवारी मध्यरात्री येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करून प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी नाताळनिमित्त कार्निवलचेही आयोजन करण्यात आले होते.
नाताळच्या निमित्ताने नातेवाईक आणि मित्र मंडळींना केक, कुकीज, चॉकलेट आणि भेटवस्तू देण्यासाठी ग्राहकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली होती. तसेच ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजची टोपी, आकर्षक हेडबॅण्ड आणि विविध खेळणी घेण्यासाठी चिमुकल्यांनी पालकांसह गर्दी केली होती. तसेच मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) लहान मुलांसाठी विविध मजेशीर खेळ आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागरिकांनी समाजमाध्यमांवर विविध गाण्यांची जोड असलेल्या चित्रफीत आणि रिल्स पाठवून नाताळनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – मुंबई : कांदळवनात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे, निविदांची छाननी सुरू
‘नाताळ’ निमित्त काहींनी शहरातील चर्चमध्ये प्रत्यक्ष भेटून, तर काहींनी समाजमाध्यमांवरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विविध ठिकाणी येशू ख्रिस्तांच्या जन्माचा लक्षवेधी देखावा साकारण्यात आला होता. तसेच छोट्या – मोठ्या दुकानांसह मॉल्समध्ये विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट आणि भव्य ख्रिसमस ट्री उभारण्यात आले होते. दरम्यान, नाताळनिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी पर्यटनस्थळी जाण्याचे बेत आखले आहेत. तर काही पर्यटकांनी मुंबईबाहेरील समुद्रकिनारे, अलिबाग, लोणावळा आणि विशेषतः कोकणातील पर्यटनस्थळी जाणे पसंत केले. मुंबईतील विविध समुद्रकिनारे, उद्याने, मॉल्स आणि चित्रपटगृहांमध्येही गर्दी झाली होती.