मुंबई: पश्चिम रेल्वेच्या ग्रॅन्टरोड स्थानकाजवळील स्लेटर रोडवरील रेल्वेच्या इमारतीला सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत काही मिनिटांतच ही आग विझवली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दक्षिण मुंबईतील ग्रॅन्टरोड रेल्वे स्थानकाजवळ सकाळी गर्दीच्या वेळी आग लागल्याची दुर्घटना घडली. तिकीट खिडकीकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आग लागली.
विद्युत यंत्रणेतून आगीच्या ज्वाळा आणि धूर बाहेर येत होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण परसले होते. काही मिनिटातच अग्निशमन दलाने ही आग विझवली.
हेही वाचा… कंगनाने केलेली याचिका खटल्याला विलंब करण्यासाठी जावेद अख्तर यांचा उच्च न्यायालयात दावा
ग्रॅन्टरोड स्थानकाच्या पश्चिमेला सध्या रेल्वेतर्फे दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे तिकीट घराकडे जाणारे प्रवेशद्वार पत्र्याने बंद करण्यात आले आहे. या प्रवेशद्वारातून स्थानकात जाण्यास प्रवाशांना बंदी आहे. त्यामुळे या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. स्थानकाच्या बाहेर पादचारी, टॅक्सी, भिकारी यांची सतत वर्दळ असते. सकाळच्या वेळी नोकरदार मंडळींची गर्दी असते. तसेच बससाठी रांगा लागलेल्या असतात.