मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर देण्यात येत आहे. मध्य रेल्वेने चेहरा ओळख प्रणाली (एफआरएस)चे सुसज्ज असे अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिला सीसी टीव्ही कॅमेरा नुकताच भायखळा रेल्वे स्थानकात कॅमेरा निर्भया निधीतून बसवण्यात आला.
सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, एलटीटी आणि कल्याण ही सहा स्थानके एकात्मिक सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत. या स्थानकात उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेले आणि चेहरा ओळखण्याची क्षमता असलेले सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित स्थानकांत जुन्या तंत्रज्ञानावर आधारित सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या स्थानकांतील सीसी टीव्ही कॅमेरे अद्ययावत करण्यात येणार आहेत.
मुंबई विभागातील ७६ स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २,५०९ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी २९७ कॅमेरे एफआरएसने सुसज्ज असतील. पहिल्या टप्प्यात मस्जिद, भायखळा, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांत पुढील दोन आठवड्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. भायखळा आणि मुलुंड या स्थानकांत एफआरएसचे १० कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच प्रत्येक स्थानकात चार ते दहा सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या स्थानकाच्या ए १, ए, बी, सी, डी आणि ई या श्रेणीनुसार कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
हेही वाचा… धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असतानाही चेंबूरमधील डोंगराळ भागात पाण्याची चणचण
मध्य रेल्वेच्या ए १, ए, बी आणि सी या श्रेणीतील रेल्वे स्थानकात चेहरा ओळख प्रणाली असलेले सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. संपूर्ण मध्य रेल्वेवर पुढील एक ते दीड वर्षात सीसी टीव्ही बसवण्याचे काम पूर्ण होणार असून यासाठी सुमारे ८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सीसी टीव्ही कॅमेरे फलाट, तिकीट आरक्षण केंद्र, वाहनतळ, मुख्य प्रवेशद्वार, पादचारी पूल येथे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमुळे आरोपींचा शोध घेणे शक्य होईल. तसेच एकूण ३० दिवसांची माहिती यात सुरक्षितपणे संग्रहित केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.