लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. २ लाख ३६ हजार ५९१ जागांसाठी पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत एकूण २ लाख १५ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील तब्बल १ लाख ३६ हजार २२९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. त्यातील तर ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, २१ हजार ९३४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १५ हजार ६३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहता येईल. पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्र विद्यार्थ्यांना २१ जून (सकाळी १० पासून) ते २४ जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा असल्यास ‘प्रोसिड फॉर ऍडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल.
हेही वाचा… सहा महिन्यात केवळ ३८ काँक्रीट रस्ते, कंत्राटदारांना कार्यादेश देऊनही कामे संथगती
विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.