स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांना पसंती
मुंबई : पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (१९ जून) सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. यंदा पारंपरिक अभ्यासक्रमासह स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांना (सेल्फ फायनान्स) विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसते आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया २७ मे ते १५ जून २०२३ या कालावधीत राबविण्यात आली होती. या कालावधीत २ लाख ४१ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडे ६ लाख ६७ हजार ८६४ अर्ज आले आहेत. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २० ते २७ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत) हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी करून शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांना अर्ज केलेल्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन पहिली गुणवत्ता यादी पाहता येईल. दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी २८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता जाहीर होईल आणि हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क भरण्यासाठी ३० जून ते ५ जुलै (दुपारी ३ वाजेपर्यंत) अशी मुदत आहे. पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क ७ ते १० जुलै या कालावधीत भरायचे आहे.
६ लाख ६७ हजार ८६४ अर्ज
विविध अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठाकडे ६ लाख ६७ हजार ८६४ अर्ज आले आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांपैकी कला शाखेसाठी ४४ हजार २११, विज्ञान शाखेसाठी २९ हजार ५८८ आणि वाणिज्य शाखेसाठी १ लाख २७ हजार ९०५ अर्ज दाखल झाले आहेत. तर स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या वाणिज्य शाखेतील बी.एम.एस. या अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक १ लाख ३० हजार ९३० अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर विज्ञान शाखेतील बी.एस्सी. आयटी अभ्यासक्रमासाठी ८८ हजार १४९ अर्ज, बी.कॉम. अकाऊंट्स व फायनान्स अभ्यासक्रमासाठी ७१ हजार ४३१ अर्ज, बी.एस्स्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमासाठी ४८ हजार ८७४ अर्ज, कला शाखेतील बी.ए. एमएमसी अभ्यासक्रमासाठी २६ हजार ४४८ अर्ज, बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी १७ हजार ३३८ अर्ज आणि बी.कॉम. बँकिंग अँड इन्शुरन्स अभ्यासक्रमासाठी १४ हजार १६ अर्ज दाखल झाले आहेत.