वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ च्या सेवा वेळेत पुन्हा एका तासाने वाढ करण्यात आली असून आजपासून सकाळी साडेपाच वाजल्यापासून मेट्रो १ ची सेवा सुरू झाली आहे. आतापर्यंत वर्सोवा आणि घाटकोपर मेट्रो स्थानकावरून पहाटे साडेसहाला पहिली गाडी सुटत होती. मात्र आता ही वेळ सकाळी साडेपाच करण्यात आली आहे.
हेही वाचा- मुंबई: रेल्वे पोलिसांवरच लक्ष्य ठेवण्याची वेळ
करोना काळात २२ मार्च ते १८ ऑक्टोबर २०२० दरम्यान २११ दिवस मेट्रो सेवा बंद होती. १९ ऑक्टोबर २०२० पासून मेट्रो सेवा सुरू झाली. मात्र करोनाचे संकट लक्षात घेता सेवेचा कालावधी आणि फेऱ्या कमी करण्यात आल्या. जसे करोनाचे संकट कमी झाले तसे टप्प्याटप्प्याने एमएमओपीएलने वेळ आणि फेऱ्या वाढवल्या. करोनाचे सर्व निर्बंध हटल्यानंतर करोना काळातील वेळ पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू केला. आता अखेर मेट्रो सेवा पूर्ववत झाली आहे. आता मेट्रोची सेवा सकाळी साडेपाच ते रात्री १२.०७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार वर्सोवा आणि घाटकोपर मेट्रो स्थानकावरून सकाळी साडेपाचला पहिली गाडी सुटण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीच्या वेळेत मात्र कोणताही बदल झालेला नाही. घाटकोपर मेट्रो स्थानकावरून रात्री ११.४४ ला शेवटची गाडी सटते तर वर्सोवा मेट्रो स्थानकावरून रात्री ११.१९ ला शेवटची गाडी सुटते ती रात्री १२.०७ ला घाटकोपरला पोहचते.