लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) हाती घेतलेल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत संपूर्ण मार्गिकेचे एकूण ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याच वेळी पहिल्या टप्प्यातील आरे – बीकेसीदरम्यानचे ८७ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कफ परेडदरम्यानचे ७६.८ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. त्यानुसार एमएमआरसीने बांधकामाबरोबर इतर तांत्रिक कामांनाही वेग दिला आहे.

‘मेट्रो ३’ मार्गिकेची कारशेड वादात अडकली होती. मात्र कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्याने मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. ‘मेट्रो ३’चे काम दोन टप्प्यात सुरू असून पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचे एमएमआरसीने जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील आरे – बीकेसीदरम्यानचे ८३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कफ परेडदरम्यानचे ७६.८ टक्के काम पूर्ण झाले असून हा टप्पा २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा… गोष्ट मुंबईची- भाग ११०: बॅकबे, वरळी आणि माहीम बे तयार झाले तरी कसे?

एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकाचे ९२.९ टक्के, बोगद्याचे ९७.७ टक्के, रुळांचे ८५.२ टक्के आणि विविध कार्यप्रणालीची ६४.७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रुळाचे ४६.२ टक्के, विविध कार्यप्रणालीचे ४२.२ टक्के, मेट्रो स्थानकाचे ८८.१ टक्के आणि बोगद्याचे ९५.२ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता या दोन्ही टप्प्यातील उर्वरित कामे वेगात पूर्ण करून निर्धारित वेळेत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास भुयारी मेट्रोने प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Story img Loader