मुंबई : बेस्ट उपक्रमातील बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे ७५ वर्षापासूनची मुंबईची रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी असलेली बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ही बाब राज्य सरकार, महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने गांभिर्याने घ्यावी यासाठी सर्व मुंबईकरांना एकत्र करून ‘बेस्ट बचाव’ अभियान राबवले जाणार आहे.
मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ प्रमाणे मुंबई महानगरपालिका ‘बेस्ट उपक्रमा’च्या माध्यमातून गेले ७५ वर्षांहून अधिक काळापासून मुंबईकरांना सेवा देत आहेत. २०१९ सालापासून खासगी कंत्राटदारांच्या बस बेस्टच्या नावाने चालवताना, बेस्ट उपक्रम आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचा करार झाला होता. त्या करारानुसार बेस्टकडे स्वमालकीचा ३,३३७ गाड्यांचा ताफा ठेवणे निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर बेस्ट उपक्रमाने २०१९ सालापासून स्वमालकीच्या बस खरेदी करणे बंद केले. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीचा ताफा कमी होण्यास सुरुवात झाली. आताच्याघडीला बेस्टच्या ताफ्यात १,०८५ बस असून संपूर्ण ताफ्याच्या ३३ टक्केच बस शिल्लक आहेत.
हेही वाचा…१२ वर्षांच्या मुलीचे वाडिया रुग्णालयात अवयवदान! चार रुग्णांना दिले जीवनदान…
बेस्ट उपक्रमातील १५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण झालेल्या बस भंगारात काढण्यात येत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या बस खरेदी केल्या नाहीत तर, ३१ मार्च २०२५ पर्यंत हा ताफा फक्त ७६१ बसचा शिल्लक राहील. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२५ नंतर २५१ बस म्हणजे फक्त ८ टक्के बसगाड्या शिल्लक राहतील. त्यानंतर मुंबईकरांना बेस्ट बसची सुविधा मिळणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे मुंबईकरांच्या सुमारे ३३ लाख प्रवाशांच्या सेवेसाठी ३,३३७ स्वमालकीचा ताफा वाढवणे आवश्यक आहे, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.
हेही वाचा…मध्य रेल्वे आज का विस्कळीत ? गोरखपूर एक्स्प्रेसमधून धुराचे लोट
बेस्टच्या ताफ्यातील खासगी बस या अवेळी धावतात. तसेच या बसमध्ये अनेक तांत्रिक बिघाड होत असल्याने, प्रवाशांचा प्रवास रखडतो. त्यामुळे आता मुंबईकरांची उत्तम सेवा मिळण्यासाठी, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढवण्यासाठी मुंबईकरांना पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवासी संघटना, सामाजिक संघटना यांना एकत्र करून १८ जुलै रोजीपासून ‘बेस्ट बचाव’ अभियान राबवले जाणार आहे, असे शशांक राव यांनी सांगितले.