मुंबई: राज्यातील किरकोळ व होलसेल औषध विक्रेते हे मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषध खरेदी करतात. यामुळे राज्यामध्ये बनावट औषधांचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेता राज्यातील बनावट औषधांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम व चांगल्या दर्जाची औषधे मिळावीत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशामध्ये औषधांची निर्मिती करणारे उत्पादक हे हिमाचल प्रदेशमधील बद्दी या परिसरात आहेत. त्याखालोखाल गुजरात व उत्तरांचलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती केली जाते. या राज्यातून येणाऱ्या औषधांमधील अनेक औषधे ही प्रमाणित दर्जानुसार नसतात. त्यामुळे नागरिकांना बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे मिळतात. महाराष्ट्रातील बहुतांश किरकोळ व घाऊक औषध विक्रेते हे या राज्यातून मोठ्या प्रमाणात औषधांची खरेदी करतात. त्यामुळे राज्यातील नागरिकांना बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बनावट औषधांचा शिरकाव राज्यात रोखण्यांच्या दृष्टीने परराज्यातून येणाऱ्या औषधांवर बारीक लक्ष ठेवण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांना परराज्यातून येणाऱ्या औषधांचा तपशिल मुख्यालयात उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा… अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवणाऱ्या मुंबईतील दोघांना अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई; बिटकॉइनद्वारे खरेदी केल्याचा संशय

अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये परराज्यातून येणारा औषधांचा तपशील जतन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालयाने स्वंतत्ररित्या ईमेल आयडी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा ईमेल आयडी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व औषध विक्रेत्यांच्या निदर्शनास आणून त्याबाबत परराज्यांतील औषध खरेदी संदर्भात देयके ईमेलवर दैनंदिनरित्या नियमितपणे पाठविण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत. ईमेलवर प्राप्त देयकांचा अभिलेखा नियमितपणे पडताळून मोठया प्रमाणात परराज्यातून खरेदी करणारे औषध विक्रेत्यांच्या आवश्यकतेनुसार तपासण्या करण्यात याव्यात व अनियमितता आढळून आल्यास कारवाई घेण्यात यावी. या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक कार्यालयाने विभागीय कार्यालयामार्फत मुख्यालयास सादर करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे मुख्यालय तथा नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील यांनी दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The food and drug administration has ordered vigilance to curb counterfeit medicines in the maharshtra to get good and quality medicines mumbai print news dvr