लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: एक तडीपार गुंड भायखळा पोलीस ठाण्यात ब्लेड घेऊन आला आणि एकच खळबळ उडाली. एका व्यक्तीची तक्रार करण्यासाठी आलेल्या या गुंडाने संबंधिताला तात्काळ अटक करा अन्यथा मी स्वतःला ब्लेड मारून तुम्हाला या प्रकरणात गुंतवीन, असे धमकावत गोंधळ घातला. एवढेच नाही, त्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने मारहाणही केली. पोलीस ठाण्यात, तसेच रुग्णालयात आरोपीने प्रचंड गोंधळ घातला. या प्रकरणानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या गुंडाला अटक केली.

पोलीस उपनिरीक्षक बालाजी आसादे भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मेहराज मुर्तझा ऊर्फ पिंडारीला (२७) भायखळा पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी हत्येचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी असे गंभीर सात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपीला एप्रिल महिन्यात तडीपार करण्यात आले होते.

हेही वाचा… मुंबई: महिलांच्या सुरक्षितेसाठी शहरात ‘वन स्टॉप सेंटर’ची संख्या वाढविणार

मेहराज अचानक भायखळा पोलीस ठाण्यात आला व त्याला हमजाने पाठवलेले संदेश दाखवले. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून हमजाला अटक करण्याची मागणी मेहराजने केली. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी त्याला समजावले. पण मेहराज ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने तोंडात लपवलेले ब्लेड काढले आणि स्वतःला ब्लेड मारून याप्रकरणात तुम्हाला गुंतवतो, अशी धमकी पोलिसांना दिली. त्यावेळी पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी त्याला रोखले आणि त्याचे हात बांधून त्याला जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळीही त्याने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकारानंतर भायखळा पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मेहराजला अटक केली

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The gangster came to the police station with a blade in mumbai print news dvr