मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एप्रिलअखेरीस होणार असून पुन्हा नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु जुनी मतदारयादी ग्राह्य धरावी, प्रत्यक्ष अर्ज जमा करणे ऐच्छिक करावे, आधारकार्ड बंधनकारक करावे, तसेच ओटीपीची आवश्यकता नसावी आणि अर्जामध्ये बदल करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांसाठी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात कुलगुरूंना घेराव घातला.
अधिसभा निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यासंदर्भात ‘मनविसे’चे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कुलगुरूंना पत्र पाठविले असून मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या सांताक्रुझ येथील कलिना संकुलात कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेतली. चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना विदुषकाचा मुखवटा घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी पदाधिकाऱ्यांना अडवले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.