मुंबई : महाराष्ट्रातील तमाम युवा रंगकर्मींना नाट्याविष्कार सादरीकरणासाठी आणि कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणाऱ्या, नाट्यवर्तुळातील प्रतिष्ठेच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची नांदी समीप आली आहे. या स्पर्धेच्या नव्या पर्वाचा प्रारंभ डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. प्राथमिक व विभागीय अंतिम फेरीत दर्जेदार एकांकिकांमध्ये चुरस रंगल्यानंतर मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी होणार असून मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाईल.
यंदा स्पर्धेला ‘जवाहरलाल नेहरू प्राधिकरण’चे (जेएनपीए) मुख्य प्रायोजकत्व लाभले असून, सॉफ्ट कॉर्नर यांची सहप्रस्तुती आणि केसरी टूर्स हे सहप्रायोजक आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर या आठही केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक व विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे.
वैविध्यपूर्ण आशय आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण असलेल्या दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या मंचावर दरवर्षी होत असते. कल्पक विचारांची भरारी घेत काल्पनिक कथा आणि गावखेड्यातील समस्यांपासून ते आजच्या आधुनिक जगात भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतची तरुणाईची विचारस्पंदने एकांकिकांमध्ये उमटतात. तसेच राजकीय – सामाजिक घडामोडींशी निगडित आणि मानवी भावभावनांचा वेध घेणारे विषयांवर एकांकिकांच्या माध्यमातून तरुणाई भाष्य करते. त्याला दर्जेदार सादरीकरणाची जोड असते. त्यामुळे या स्पर्धेने नाट्यक्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने आणि कल्पक विचारशक्तीने सजलेल्या या स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाची पहिली घंटा घणघणली असून महाअंतिम फेरी २१ डिसेंबर रोजी रंगणार आहे. त्यापूर्वी विभागीय अंतिम फेरी आणि प्राथमिक फेरी होईल. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक व इतर तपशील लवकरच ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध करण्यात येतील.
‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा तरुणाईला नेहमीच आकर्षित करत आली आहे. तरुणाईनेही कसदार अभिनय आणि लक्षवेधी ठरणाऱ्या तांत्रिक बाजूंच्या जोरावर दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेसाठीची लगबग पुन्हा एकदा महाविद्यालयांच्या तालीम सभागृहात पाहायला मिळणार आहे. ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरण्यासाठी संहितेच्या निवडीनंतर सामूहिक वाचन, लेखक – दिग्दर्शकांसह आजी – माजी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा, व्यक्तिरेखांवर काम करून कसदार अभिनय करण्यावर भर, कथेला साजेसे नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा आणि संगीत निर्मितीवर विशेष लक्ष देऊन अत्यंत कल्पकतेने एकांकिका साकारण्यासाठी नाट्यजागर रंगणार आहे.
हेही वाचा >>>मोसमी पावसाची देशातून माघार, दक्षिणेत ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय
‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील, ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले कलागुण सादर करीत असतात . नाट्यसंस्कृतीच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने लोकसत्ता राबवित असलेल्या या उपक्रमाला जेएनपीएचे कायमस्वरूपी संपूर्ण सहकार्य असेल. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारतासाठी जाहीर केलेल्या ‘पंच प्राण’ संकल्पांमध्ये आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन यांचा समावेश आहे. नुकताच अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी जेएनपीएचे हे पहिले पाऊल!– उन्मेष वाघ, अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू प्राधिकरण
‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रातील शहरे आणि ग्रामीण भागातील नाट्यवेडया तरुणांसाठी महत्त्वाची ठरत आहे. या स्पर्धेने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. सॉफ्ट कॉर्नर हे या स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून ‘लोकसत्ता’शी जोडलेले आहे आणि यावर्षीही आमचे सहकार्य या स्पर्धेला असेल.- दिलीप कुलकर्णी, अध्यक्ष, सॉफ्ट कॉर्नर
मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू प्राधिकरण
सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक : केसरी टूर्स
सहाय्य : अस्तित्व
टॅलेंट पार्टनर :आयरिस प्रोडक्शन्स