दादरच्या शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील गुलमोहोराचे झाड रविवारी रात्री पावसामुळे कोसळले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच हे झाड लावले होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळावर जाऊन या झाडाची सकाळी पाहणी केली.

बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुलमोहराचे झाड लावले होते. या झाडाजवळच शिवसेनाप्रमुखांचे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. मुंबईमध्ये रविवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळू लागला आणि पावसाच्या तडाख्यात गुलमोहराचे जुने झाड उन्मळून पडले. स्मृतीस्थळाच्या कुंपणावरच हे झाड कोसळले असून कुंपणाचेही नुकसान झाले आहे.

येथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने सकाळी पडलेले झाड पाहिले आणि याबाबत किशोरी पेडणेकर यांना माहिती दिली. त्यानंतर त्या स्मृतीस्थळी पोहोचल्या. दरम्यान, उन्मळून पडलेले गुलमोहराचे झाड तेथेच काही अंतरावर तत्काळ पुनर्रोपीत करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात झाडांची पडझड होत असते, पण या झाडाशी आमची जवळीक आहे, अशी भावना यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

Story img Loader