मुंबई: राज्या कामगार विमा योजनेअंतर्गत असलेले एकूण विमाधारक आणि विमा योजनेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त असल्याचे आढळून आले आहे. ही रुग्णालये राज्य कामगार विमा सोसायटीमार्फत चालवणे शक्य नसल्यास आरोग्य विभागाअंतर्गत चालविण्याबाबचा प्रस्ताव सादर करण्यास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आरोग्य उपचारांचा सविस्तर आढावा संबंधित अधिकारी व डॉक्टरांची बैठक घेऊन सप्टेंबर महिन्यात घेतला होता. या बैठकीत रुग्णोपचाराची समोर आलेली आकडेवारी अत्यंत कमी असल्याचे आढळून आले. तसेच रुग्णालयांमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यापासून ते केंद्र शासनाकाडून मिळत असलेल्या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. राज्य कामगार विमा सोसायटीला रुग्णालये चालविणे शक्य होत नसल्यास आरोग्य विभागामार्फत ही रुग्णालये चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य आयुक्त धीरजकुमार तसेच विमा योजनचे संचालक डॉ. अलंकार खानविलकर व आरोग्य विभागाचे संबंधित सहसंचालक आदी उपस्थित होते.

हेही वाचा… मुंबईसह देशातील प्रमुख संग्रहालयांना धमकीचे ‘ई-मेल’

राज्य विमा योजनेची राज्यात १२ रुग्णालये १०८ दवाखाने आहेत. तसेच राज्यातील २३ जिल्ह्यांमधील २१६ खाजगी रुग्णालयांबरोबर संलग्नता योजनेअंतर्गत रुग्णांवर उपचार केले जातात. ‘विमा योजनेची मुंबईत अंधेरी, वरळी, मुलूंडसारख्या ठिकाणी रुग्णालये आहेत. मात्र येथील खाटांच्या संख्येच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे आढळून आले आहे. विमा सोसायटीअंतर्गत ४४ लाख ५५ हजार ४९० नोंदणीकृत विमाधारक आहेत. राज्य कामगार विमा सोसायटीकडे विमाधारक कामागारांकडून मिळणारी वर्गणी तसेच मालकांकडून व केंद्र सरकारकडून मिळणारा निधी आणि रुग्णालयांवर होणारा खर्च यातही बरीच तफावत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. विमा योजनेच्या रुग्णालयांमधील मंजूर पदांपैकी डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ५१ टक्के पदे रिक्त आहेत. मागील काही वर्षांमध्ये विमा योजनेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाह्यरुग्ण व आंतररुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी ती पुरेशी नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. विमाधारक कामगार व उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमालीचे व्यस्त आहे.

विमा योजनेच्या एकूण रुग्णालयांमध्ये २०१९-२० मध्ये बाह्य रुग्ण विभागात १८ लाख ६२ हजार रुग्णांची उपचार घेतले. एक लाख ३८ हजार आंतररुग्ण होते तर सुमारे चार हजार छोट्या व माठ्या शस्त्रक्रिया झाल्या. याशिवाय संलग्न खाजगी ( टायअप) रुग्णालयांमध्ये १८,६०७ रुग्णांना संदर्भित करण्यात आले होते. २०२२-२३ मध्ये बाह्यरुग्ण विभागात २९ लाख ६० हजार रुग्णांवर उपचार केले गेले तर एक लाख ५९ हजार आंतररुग्ण होते. याशिवाय छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया १३ हजारांहून अधिक करण्यात आल्या असून ९७ हजार ३२५ रुग्णांना खाजगी संलग्न रुग्णालयात संदर्भित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत विमा योजनेच्या रुग्णालयातील रुग्णोपचार वाढला हे मान्य केले तरी एकूण विमाधारक व प्रत्यक्ष उपचार घेणारे लाभार्थी यांच्यात मोठी तफावत असून या दृष्टीने ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. विमा योजनेअंतर्गत रुग्णालये वाढविण्याचे अनेक प्रस्ताव आहेत मात्र विद्यमान रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे याचा आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून विमा योजनेची रुग्णालये चालविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विमा योजनेच्या रुग्णालयांचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा मिळणे गरजेचे आहे. विमा योजनेकडे जमा होणारा निधी व प्रत्यक्षात होणार खर्च यातही तफावत असून रुग्णालयांचा विस्तार करण्याची योजनाही प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या दिसतात. मुंबईतील प्रमुख रुग्णालयांचे नूतनीकरण करणे गरजेचे असून याबाबत सखोल आढावा घेतल्यानंतर जर विमा सोसायटीला ही रुग्णालये चालवणे शक्य नसेल तर आरोग्य विभागामार्फत चालविण्याची भूमिका मी मांडली व त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The health department will run the hospitals of the state labor insurance scheme mumbai print news dvr
Show comments