मुंबई : अपंग व्यक्तींशी संबंधित कल्याणकारी धोरण आखणारे राज्य सल्लागार मंडळ सप्टेंबर महिन्नाअखेरपर्यंत कार्यान्वित करा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. तसेच, मंडळ कार्यान्वित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या हेही प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारला सप्टेंबर अखेरपर्यंत मंडळ कार्यान्वित करावेच लागेल आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर त्याला कार्यालयासह कर्मचारी, विद्युत उपकरणांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, असे आदेशही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. आदेश देऊनही मंडळ कार्यान्वित केले न केल्याने न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी सरकारला धारेवर धरले होते व महाधिवक्त्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी, मंडळ कधीपर्यंत कार्यान्वित करणार हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने अखेर उपरोक्त आदेश दिले.

हेही वाचा >>>पुढील दोन आठवडे मुंबई ‘रेलनीर’विना; आयआरसीटीसीच्या विरोधातील आंदोलन मागे

दरम्यान, मुंबईतील काही पदपथ अद्यापही अपंगस्नेही करण्यात आलेले नाही, असे या प्रकरणी न्यायालयाचे मित्र (ॲमायकस क्युरी) म्हणून नियुक्त केलेले वकील जमशेद मिस्त्री यांनी खंडपीठाला सांगितले. ही माहिती महापालिकेला त्वरीत द्या, ते त्याकडे लक्ष देतील, असे न्यायालयाने मिस्त्री यांना सांगितले. महापालिकेने या समस्येसंदर्भात तक्रारींसाठी काही संपर्क क्रमांक उपलब्ध करण्याची मागणीही मिस्त्री यांनी केली. त्यावर, मंडळ कार्यान्वित होईपर्यंत प्रतीक्षा करा. मंडळ कार्यान्वित झाल्यावर तुमच्या चिंतेचे निराकरण होईल. पुढील सुनावणीदरम्यान याबाबत आम्हाला आठवण करून द्या, असे स्पष्ट करून न्यायालयाने सुनावणी २६ सप्टेंबर रोजी ठेवली.

व्हीलचेअरवरील अपंगासाठी गैरसोयीचे ठरणाऱ्या पदपथावरील स्टीलच्या खांबातील (बोलार्ड) अंतराच्या मुद्याप्रकरणी न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका करून घेतली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी, सल्लागार मंडळ कार्यान्वित करण्याचे आदेश देऊनही ते कार्यान्वित कऱण्यात आले नसल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे, न्यायालयाने सरकारला फटकारले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The high court issued a warning to the state government regarding the advisory board for the disabled mumbai print news amy