दोषमुक्तीचा अर्ज नव्याने ऐकण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई : मनसे कार्यकर्त्यांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी सांगलीतील कोकरूड पोलिसांनी नोंदवलेल्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळण्याचा इस्लामपूर सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. तसेच राज यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
सत्र न्यायलयाच्या आदेशाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सांगलीतील आंदोलनाला मी चिथावणी दिली, अशा आरोपाखाली आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्या कथित गुन्ह्याच्या घटनेच्या वेळी आपण तेथे उपस्थितच नव्हतो. आपण स्वत: त्यावेळी अटकेत होतो. त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. या सर्व बाबी सांगलीमधील दोन्ही न्यायालयांनी विचारातच घेतलेल्या नाहीत. शिवाय सत्र न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्याची कारणे नमूद केलेली नाहीत. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळताना कारणे नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश आणि सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करावा आणि आपल्याला आरोपमुक्त करावे, अशी मागणी राज यांच्या वतीने वकील राजेंद्र शिरोडकर यांनी केली.
हेही वाचा >>>माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवले; जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिकेची कारवाई
न्यायालयाने राज यांच्या वतीने केलेला युक्तिवाद मान्य केला. तसेच त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्याचा इस्लामपूर सत्र न्यायालयाचा निर्णय न्यायमूर्ती बोरकर यांच्या एकलपीठाने रद्द केला. तसेच राज यांच्या या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे आणि कारणांचा समावेश असलेला निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.दरम्यान, या प्रकरणातून आरोपमुक्त करण्याच्या मागणीसाठी राज यांनी २०१३ मध्ये केलेला अर्ज न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी फेटाळला. त्यानंतर राज यांनी ११ जुलै २०२२ रोजी पुन्हा आरोपमुक्तीसाठी अर्ज केला. मात्र, तोही १५ ऑक्टोबर रोजी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला.
प्रकरण काय ?
परप्रांतीयांविरोधातील हिंसक आंदोलनाच्या प्रकरणात राज यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी २१ ऑक्टोबर २००८ रोजी रत्नागिरीतून अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातील विविध भागांत उमटले होते. या अटक कारवाईच्या निषेधार्थ मनसेने बंद पुकारल्यानंतर सांगलीतील शेडगेवाडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सक्तीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जमावबंदीचा आदेश काढण्यात आला असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अशी ताकीद पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिली होती. तरीही ‘राज ठाकरे तुम आगे बढो…’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी आठ कार्यकर्त्यांना अटक केली. तसेच राज यांनी त्यांना चिथावणी दिली, अशा आरोपाखाली राज यांच्यासह दहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.