एखाद्याचा व्यवसाय हिरावून शहर सुंदर दाखवायचे आहे का ? असा प्रश्न करून जी-२० शिखर परिषदेच्या प्रतिनिधींच्या भेटींचा हवाला देऊन बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील आरे दुधाचा स्टॉल जमीनदोस्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला फटकारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>“शीझान खानला फाशी द्या”, तुनिषा शर्माच्या आईला भेटल्यानंतर रामदास आठवलेंची मागणी

कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय किंवा नोटिशीविना दुकानावर कारवाई करण्यात आल्याचे याचिकाकर्ते शिवमूरत कुशवाह यांच्यातर्फे सांगण्यात आल्यावर न्यायमूर्ती माधव जामदार आणि संतोष चपळगावकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने महानगरपालिकेला धारेवर धरले. अनेक इमारती अनधिकृत आहेत. शिवाय अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई करीत नाही, पण एका छोट्या विक्रेत्याच्या दुकानावर कारवाई करता, अशा शब्दांत न्यायालयाने महानगरपालिकेची कानउघाडणी केली.

त्यावर जी २० शिखर परिषदेच्या प्रतिनिधींच्या भेटीमुळे स्टॉलवर कारवाई करण्यात आल्याची कबुली महानगरपालिकेच्या वतीने यावेळी देण्यात आली. महानगरपालिकेच्या या भूमिकेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच केवळ जी-२० परिषदेचे प्रतिनिधी आल्याच्या कारणास्तव महानगरपालिका नागरिकांचे कमावण्याचे साधन हिरावून घेणार का ? असा संतप्त प्रश्न न्यायालयाने केला. या परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी रस्ता रोधक (बॅरिकेड्स) उभारून परिषद प्रतिनिधींचा मार्ग सुरक्षित करण्यात आला. त्याचप्रकारे याचिकाकर्त्याच्या दुकानासमोरही रस्ता रोधक उभारता आला असता, असे न्यायालयाने म्हटले.

हेही वाचा >>>मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक

पर्यायी जागा उपलब्ध करण्याचे आदेश
याचिकाकर्त्याच्या दुकानावरील बेकायदा कारवाईमुळे महानगरपालिकेने आता त्याला पर्यायी जागा उपलब्ध करावी, असेही स्पष्ट केले. न्यायालयाची सूचना मान्य करून याचिकाकर्त्याला त्याच्या आधीच्या दुकानापासून ४५ मीटर अंतरावर नवा स्टॉल लावण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे महानगरपालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र या जागी दुकान सुरू केले तर विक्री घटण्याची भीती याचिकाकर्त्यांतर्फे व्यक्त करण्यात आली. त्यावर याचिकाकर्त्याला मध्यभागी कुठेतरी दुकानासाठी परवानगी देण्याची सूचना न्यायालयाने केली. तीही महानगरपालिकेनेही मान्य केली. तसेच जी-२० शिखर परिषद वर्षभर अधूनमधून होणार असल्याने महानगरपालिकेने याचिकाकर्च्याला त्याचा स्टॉल बंद करण्याबाबत १० दिवस आगाऊ सूचना देण्याचे आदेशही महानगरपालिकेला दिले.

हेही वाचा >>>मुंबई: बेस्ट बसचालकाला मारहाण, आरोपीला अटक

प्रकरण काय ?
याचिकाकर्ते हे २०२१ पासून आरे दुग्ध प्राधिकरणाद्वारे वाटप केलेल्या दुधाचे दुकान चालवत होते. २०१६ मध्ये, त्यांना उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी ११ डिसेंबर रोजी याचिकाकर्त्याला १२ ते १६ डिसेंबरदरम्यान जी-२० प्रतिनिधींच्या भेटीमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुकान बंद ठेवण्यास सांगितले होते. १७ डिसेंबर रोजी याचिकाकर्त्यांने पुन्हा स्टॉल उघडला. मात्र दुपारी दोनच्या सुमारास आर (मध्य) प्रभागाच्या पथकाने त्यांचा स्टॉल जमीनदोस्त केला. या स्टॉलच्या माध्यमातूनच आपला आणि आपल्या दोन कामगारांचे घर चालत असल्याचे याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The high court reprimanded the mumbai municipal corporation for demolishing aarey milk stall for the g20 conference mumbai print news amy