अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाची कथा सुचली. त्यानंतर त्यांनी मला कथा ऐकवली आणि माझ्या कल्पनेतून ती फुलवायला सांगितली. मग चर्चा, पटकथेचा पहिला खर्डा, दुसरा खर्डा अशा पद्धतीने कथानक आकारत गेले, असे लेखक अजय कांबळे यांनी सांगितले. तर कथाकल्पना प्रसादची असली तरी त्यातल्या घडामोडी, पात्रं लेखन असे सर्वांगीण संस्कार अजयने केलं आहे, अशा शब्दांत अभिनेता स्वप्निल जोशीने अजयचं कौतुक केलं.
एकत्र काम करण्याची इच्छा पूर्ण
माझी आणि स्वप्निलची खूप वर्षांपासून एकत्र काम करण्याची इच्छा होती, परंतु आजवर आमच्या जोडीच्या अनुषंगाने अनुरूप कथानक मिळत नव्हते. अखेर ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने तसे कथानक मिळाले आणि प्रसाद ओकला त्यासाठी स्वप्निल आणि माझं नाव सुचलं, अशा शब्दांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी चित्रपटाशी जोडलं जाण्यामागची गंमत उलगडली. ही कथा मजेशीर, मिश्कील आहे. आम्ही दोघे काम करताना खूप हसलो आणि धमाल केली, त्यामुळे हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांनाही तोच अनुभव मिळणार आहे, असंही सोनाली यांनी सांगितलं.
अडचणीतून बाहेर पडण्यातले धडपड रंगवणारे चित्रपट कमी…
मराठीत एकंदरीतच कुठल्यातरी अनपेक्षित घटनाचक्रात फसल्यानंतर त्यातून सुटकेसाठीची धडपड रंगवणाऱ्या कथा फारशा पाहायला मिळत नाहीत. ‘वाळवी’ हा थोडा त्या पद्धतीचा तरी काहीसा विनोदी चित्रपट होता. ‘सुशीला – सुजीत’ची कथाही विनोदीबाजाची आहे, पण अनेकदा कोणीतरी अडचणीत आहे म्हटल्यावर आपल्या मनात फक्त एका व्यक्तीचाविचार येतो. या चित्रपटात मात्र दोन जण एका विचित्र परिस्थितीत अडकले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, इथे प्रासंगिक विनोदांची पेरणी आहे, असं स्वप्निलने सांगितलं.
प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची
या चित्रपटात आमच्या दोन मुख्य भूमिकांबरोबरत इतर पात्रांचीही प्रत्येकाची भूमिका रंजक आहे. त्यातले एकही पात्र बाजूला केले, तरी चित्रपट पुढे जाणार नाही. कथानकाच्या अनुषंगाने पात्र निवड उत्तम झाली आहे. प्रेक्षकांना चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत संबंधित कलाकाराऐवजी चित्रपटातलं पात्र अधिक जाणवेल. ही लेखन व दिग्दर्शनाची ताकद आहे, असं स्वप्निल यांनी सांगितलं.
प्रेक्षकांची अभिरुची बदलली…
टाळेबंदीनंतर भारतीय प्रेक्षकांची अभिरुची बदललेली आहे. ओटीटी माध्यम आणि वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये जाऊन प्रेक्षक भारतासह जगभरातील चित्रपट पाहत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना चांगलं लेखन आणि अभिनय पाहण्याची सवय झाली आहे. परिणामी, या वातावरणात आम्ही कलाकार सरधोपट काम करू शकत नाही. या स्पर्धेचं आम्हाला भान असून चांगलं काम करण्याची जबाबदारीही आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला लेखक – दिग्दर्शकांकडून वैविध्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळते, याचा आनंद आहे, असं सोनाली यांनी सांगितलं.
…आणि पंचक योग जुळून आला
वेगवेगळ्या भाषेतील ‘सर्व्हायव्हल थ्रिलर’ चित्रपट पाहिले होते. त्यामुळे या प्रकारात एकाऐवजी दोन पात्रं असावीत, या कल्पनेने मी ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाचा कथालेखक झालो. मी दिग्दर्शन करणारच होतो. संपूर्ण कथा ऐकल्यावर सर्व मिळून निर्मिती कंपनी सुरू करण्याचा प्रस्ताव स्वप्निलने ठेवला. आम्हालाही ते पटलं आणि सगळं जुळून आल्यामुळे मी निर्माताही झालो. ऐन वेळेला एका नटाची अडचण झाली, म्हणून मी अभिनय केला. नखाते गुरुजी ही छोटेखानी छान भूमिका मी केली आहे. शिवाय, चित्रपटातील एक गाणं हे गायकाचं नसून अभिनेत्याचं आहे, असं आमचे संगीतकार वरुण लिखते यांचं म्हणणं होतं. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय आणि गायन अशा पद्धतीचा पंचक योग या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला, अशी भावना पंचशील एन्टरटेन्मेट या नव्या निर्मितीसंस्थेंतर्गत ‘सुशीला – सुजीत’ची गोष्ट घडवून आणणाऱ्या प्रसाद ओक यांनी सांगितलं.
शब्दांकन : अभिषेक तेली