दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. मुंबईतील ठिकठिकाणच्या मानाच्या गणपतींचे विसर्जन सकाळपासून सुरू झाले आणि अवघी मुंबापुरी गणेशाच्या गजराने दुमदुमली आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लोकसत्ताचे अॅप डाऊनलोड करून लॉग-इन करा
हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात, म्हणाले, “मागील काळात…”
लालबागचा राजा, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शनच्या गणपतीला निरोप देण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच लालबाग परिसरात भाविकांची अलोट गर्दी केली आहे. फटाक्यांची आतशबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. लालबाग परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि भाविकांची गर्दी वाढू लागली. त्याच वेळी लालबागच्या राजाची आरती सुरू झाली. आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाचा रथ खेचण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लालबागच्या बाजारपेठेतून लालबागचा राजा बाहेर पडला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उभ्या असलेल्या भाविकांनी एकच जल्लोष केला. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईसह अन्य शहरांतूनही भाविक आले आहेत. लालबाग, परळ आणि आसपासच्या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जन मार्गावर मार्गस्थ होऊ लागल्या. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक कोंडी झाली. परिणामी वाहतून अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरूवात होताच गिरगाव, खेतवाडीसह आसपासच्या मंडळांमध्ये गणेश विसर्जनाची लगबग सुरू झाली असून गिरगावातील मानाचे गणपती अशी ओळख असलेले एस. व्ही. सोहनी पथ येथील गिरगावचा राजा आणि मुगभाटमधील गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.