देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारा व प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. शिवाय, विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत देखील सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली असून, गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास सांगण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुका व मोठ्या संख्येने एकत्र येणे इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असूनही सरकारच्या या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करत अर्नाळामध्ये काल वाजगाजत शेकडो नागरिकांनी एकत्र येत विसर्जन मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला.
करोना काळात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी असतानाही विरारमधील अर्नाळा गावात (गुरूवार), गावातील सार्वजनिक गणपतीची मोठ्या संख्येने वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो जण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यावेळी सोशल डिस्टिंगचा पुरता फज्जा होता. मास्क न परिधान न करताच अनेकजण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी या मिरवणुकीला रोखण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जमावापुढे पोलीस काहीसे हतबल झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी या ठिकाणांहून काढता पाय घेतला.
विशेष म्हणजे या अगोदर तीन वेळा अर्नाळा परिसर हा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तालुक्यातील सर्वाधिक ग्रामीण भागातील रुग्ण हे अर्नाळा परिसरातील आहेत. असे असतानाही गावकरी शासनाचे नियम धाब्यावर बसवत आहेत.