मुंबई : क्षयग्रस्त बालकांसाठी बेडाक्विलिन हे महत्त्वपूर्ण औषध असून या औषधाचे पेटंट मिळवण्यासाठी जॉन्सन ॲण्ड जाॅन्सन कंपनीने भारतीय पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला होता. पेटंट दिल्यास कंपनीची मक्तेदारी निर्माण होऊन हे औषध महाग होईल, तसेच बेडाक्विलिनमध्ये वापरण्यात येणारे घटक अन्य औषधांमध्ये वापरले जात असल्याचे सांगत या पेटंट अर्जाला क्षयरोगातून मुक्त झालेल्या नागरिकांनी आव्हान दिले होते. या आव्हानामुळे पेटंट कार्यालयाने कंपनीचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे क्षयरोगग्रस्त लहान मुलांना स्वस्तात औषध मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षयरोग रुग्णांसाठी जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनी बेडाक्विलिन हे औषध तयार करते. या औषधाचे पेटंट मिळविण्यासाठी कंपनीने केलेल्या अर्जाला २०२० मध्ये क्षयरोगातून मुक्त झालेले व क्षयरोगग्रस्तांसाठी काम करणारे गणेश आचार्य आणि सिव्हिल सोसायटी ग्रुपने आव्हान दिले होते. या आव्हानामध्ये कंपनी ज्या बेडाक्विलिन औषधासाठी पेटंट मागत आहे, हे औषध नवीन नाही. तसेच यामध्ये वापरण्यात येणारे विविध घटक हे प्रौढ क्षयरोगग्रस्तांसाठी अन्य कंपन्यांमार्फत बनवण्यात येणाऱ्या औषधात वापरले जातात. त्यामुळे बेडाक्विलिन या औषधासाठी कंपनीला पेंटट दिल्यास हे औषध बनवण्यामध्ये पुढील काही वर्षे कंपनीची मक्तेदारी निर्माण होईल. त्यामुळे अन्य औषध कंपन्यांना या औषधाची निर्मिती करणे शक्य होणार नाही. परिणामी औषध महाग होऊन क्षयरोगाचा सामना करणे मुश्किल होईल, असा दावा गणेश आचार्य आणि सिव्हिल सोसायटी ग्रुपने केला होता. याची दखल घेत भारतीय पेटंट कार्यालयाने जाॅन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीचा पेटंट अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे लहान मुलांसाठी बेडाक्विलिन औषध बनवण्याचा अन्य कंपन्यांच्या मार्ग मोकळा होऊन लहान मुलांसाठीचे औषध स्वस्त दरात उपलब्ध होण्यास मदत होईल, असे गणेश आचार्य यांनी सांगितले. भारतीय पेटंट कार्यालयाच्या निर्णयाचे क्षयरोगातून मुक्त झालेल्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian patent office rejected johnson and johnson application mumbai print news amy