मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मानखुर्द, मंडाळे मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील कुर्ला हलावपुलावरील गर्डरची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गर्डरची उंची वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी गर्डर उभा करण्यात आला आहे, तो भाग फनेल झोनमध्ये येतो, त्यामुळे एका निश्चित मर्यादेपलिकडे उंची वाढविता येणार नाही, अशी भूमिका एमएमआरडीएने घेतली होती. पण आता मात्र एमएमआरडीएने विमानतळ प्राधिकरणासमोर हा विषय ठेवण्याची भूमिका घेत स्थानिकांना काहीसा दिलासा दिला आहे.
‘मेट्रो २ ब’ मार्गिका कुर्ला पश्चिम आणि पूर्व भागाला जोडत पुढे मंडाळेच्या दिशेने जाते. ही मार्गिका पुढे नेण्यासाठी कुर्ला पश्चिम येथील हलावपुलावर ३.५० मीटरचा गर्डर बसविण्यात आला आहे. या गर्डरची उंची कमी असल्याने मोठ्या वाहनांच्या वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे गर्डरची उंची ५.५ मीटर करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यासाठी एमएमआरडीएला पत्रही पाठविण्यात आले आहे. दरम्यान, गणेशमूर्तींचे आगमन सुरू झाले असून मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमनात अडचण येत आहेत. विसर्जनाच्या वेळीही हा मुद्दा गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्डरची उंची वाढविण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण हा परिसर फनेल झोनमध्ये असून नियमानुसारच गर्डरची उंची ठेवण्यात आल्याचे एमएमआरडीएने म्हणणे आहे.
हेही वाचा >>>Police Recruitment in December: डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे
या पार्श्वभूमीवर मंगळवारी एमएमआरडीएचे अधिकारी, पोलीस अधिकारी, पालिका अधिकारी आणि स्थानिक रहिवासी यांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत एमएमआरडीएने गर्डरची उंची वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती रहिवाशांनी दिली.