आर्थिक विवंचना असली की त्यावर कशी मात करायची हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. संकटातून बाहेर पडताना काही जण कमालीचे धर्य दाखवतात तर काहीजण अशा वेळी गुन्हेगारीचा मार्ग पत्करतात. व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यानंतर ते भरून कसे काढायचे याचा भुंगा त्याच्या डोक्यात होता, नुकसान भरून काढण्यासाठी ज्याच्याकडे व्यवसायातील धडे गिरवले त्या मालकाचेच पाच कोटी रुपयांसाठी अपहरण करण्याचे त्याने ठरविले, त्यात किंचित यशही मिळाले. पण मालकाच्या प्रसंगावधानामुळे तो वाचलाच, पण गुन्हे शाखेच्या तपासामुळे हे धाडस करणाऱ्या सर्वाच्या हाती बेडय़ा पडल्या.
बोरिवली (प.) चिकुवाडी येथे राहणारे राजेश कौशल हे हिरे व्यापारी आहेत. दहिसर येथे हिऱ्यांना पलू पाडण्याचा त्यांचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे १६ मार्चच्या सकाळी ते कारखान्यात जाण्यास कारने निघाले. त्या वेळी रस्त्यात एक वॅगनआर ही कार आडवी आली. त्यातून दोन माणसं खाली उतरली आणि काही कळायच्या आत त्यांनी कौशल यांच्या गाडीत प्रवेश केला. कौशल यांना मारहाण करत, गाडी सुरू करण्यास त्यांनी सांगितले, त्यांच्याकडील मोबाइल, सोने त्यांनी काढून घेतले. कार लिंक रोडने दहिसरच्या दिशेने जात असताना दुसरी एक कार त्यांच्या कारला समांतर धावत होती. एव्हाना कौशल यांना अंदाज आला की या दोन माणसांनी त्यांचे अपहरण केले आहे. कारच्या मार्गात एक रिक्षा आल्याने वेग काहीसा कमी झाल्याचे पाहून कौशल यांनी दरवाजा उघडून उडी मारली आणि रस्त्यावरून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. आपण थांबलो तर आपणही पकडले जाऊ, या भीतीने कौशल यांच्या कारमध्ये घुसलेल्या दोघांनी ती गाडी तिथेच टाकून वॅगनआरमधून पळ काढला. कौशल यांनी एम. एच. बी. पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याचा गुन्हा नोंदविला.
दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकाराची दखल घेऊन गुन्हे शाखेने साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ११ आणि १२ यांची पथके तयार केली. पोलिसांनी कौशल यांच्या कारखान्यात काम करणारे, त्यांचा व्यवहार असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू केली. त्यात, हिऱ्यांना पलू पाडणारी एक व्यक्ती चार ते पाच वर्षांपूर्वी कौशल यांचा कारखाना सोडून गेल्याचे लक्षात आले. ही व्यक्ती कौशल यांच्या संपर्कातही होती. त्यातच, कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती आणि इतर संशयित सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कुलूपवाडी जंक्शन, बोरिवली (पू.) येथे येणार असल्याचे कळले. पोलिसांनी तातडीने सापळा रचत दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पठाणवाडी, मालाड आणि भारत कंपाउंड, काशिमिरा येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
मुकेश परमार (४०) हा कौशल यांच्या कंपनीत पलू पाडण्याचे काम करत होता. त्याने चार वर्षांपूर्वी हे काम सोडून स्वतचा कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला कमालीचा आíथक फटका बसला. नुकसान कसे भरून काढायचे या विवंचनेत तो असताना दारूच्याही आहारी गेला. कौशल यांच्याकडे त्याचे सतत येणे-जाणे असायचे, त्याच वेळी त्याला कौशल यांनी गुजरातमधील एक जमीन विकली असून त्याचे पाच कोटी त्याला मिळाल्याचे कळले. ही गोष्ट मुकेशने केजूल मोरबिया (२४) या मित्राला सांगितली. कौशलचे अपहरण केले तर सहज पाच कोटी मिळतील असे त्याने केजूलला सांगितले. केजूलने त्याचे मित्र असलेले बॉस पांडे (३१), रमेश पार्टे (३८) यांना या कटात सहभागी करून घेतले. कौशल यांचे अपहरणही त्यांनी केले, पण कौशल यांचे प्रसंगावधान आणि पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे चारही जणांना बेडय़ा ठोकण्यात यश मिळाले. कक्ष १२ चे प्रभारी निरीक्षक सुनील जाधव, कक्ष ११चे पोलीस निरीक्षक नवनाथ सोनवणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर हारपुडे, रईस शेख, शरद झिने आणि उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांनी या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा