मंगल हनवते

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरारमधील बोळिंज येथील गृहप्रकल्पातील शिल्लक घरांची विक्री होत नसल्यामुळे कोकण मंडळ चिंताग्रस्त झाले होते. मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातून वसई-विरारसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केल्यामुळे आता बोळिंज प्रकल्पातील पाण्याची  समस्या दूर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या घरांच्या विक्रीबाबत  मंडळाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथील २२७८ पैकी शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती सुरूच राहणार आहे. बोळिंज येथील सुमारे दहा हजारांच्या गृहप्रकल्पातील  दोन हजारांहून अधिक घरे ही अनेक वेळा सोडत काढून आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट करूनही विकली जात नसल्याने कोकण मंडळाची चिंता वाढली होती.

येत्या १३ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीत विकल्या न गेलेल्या २२७८ घरांचा समावेश करण्यात आला आहे.  घरांसाठीच्या अर्जस्वीकृतीची मुदत शुक्रवारी रात्री ११.५९ वाजता संपली असून या कालावधीत २२७८ घरांसाठी केवळ ४५४ अर्ज अनामत रक्कमेसह जमा झाले आहेत. त्यामुळे केवळ ४५४ घरेच विकली जाण्याची हमी मिळाली आहे. मंडळाने  बोळिंजमधील घरांच्या अर्जविक्रीला २ डिसेंबपर्यंत, तर आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज जमा करण्यासाठी ४ डिसेंबपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या घरांची अर्जविक्री सुरू राहणार आहे.  आता ४ डिसेंबरनंतरही अर्जविक्री-स्वीकृती सुरूच राहणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिली.बोळिंज प्रकल्पात पाण्याची  समस्या दूर झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे, असे  मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>अर्थव्यवस्थेत पाच वर्षांत दुप्पट वाढ आव्हानात्मकच! महत्त्वाच्या कृषी आणि उद्योग क्षेत्रांमध्ये दमदार कामगिरी आवश्यक

४५४ अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र..

बोळिंजमधील २२७८ घरांसाठी आतापर्यंत ४५४ इच्छुकांनी अनामत रक्कमेसह अर्ज जमा केले आहेत. आता उर्वरित घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृती सुरूच राहणार आहे. त्याच वेळी ४५४ अर्जदारांना सोडतीत समाविष्ट न करता त्यांना थेट विजेते म्हणून घोषित केले जाणार आहे. तर इमारत, घर क्रमांक निश्चित करून या विजेत्यांना येत्या काही दिवसांतच तात्पुरते देकारपत्र वितरित करून घरांचा ताबा देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The konkan mandal is worried because the remaining houses in the housing project at bolinj in virar of the konkan mandal of mhada are not being sold amy