लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबईतील अनेक उपनगरीय रुग्णालये सुपरस्पेशालिटी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार मुलुंडमधील एम टी अगरवाल रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे रुग्णालय नव्या वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. हे रुग्णालय सुरू झाल्याने मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील भार कमी होण्यास मदत होईल. तसेच या रुग्णालयाचा साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक रुग्णांना लाभ होईल.
मुंबईतील नागरिकांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून रुग्णालये व त्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेची उपनगरीय रुग्णालये सक्षम करण्यासाठी तेथे सुपर स्पेशालिटी रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसारच मुलुंडमधील एम.टी. अगरवाल हे रुग्णालय ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय साकारण्यात येत आहे.
हेही वाचा… शीवमध्ये चारचाकी गाडीचा पहाटे अपघात, दोन ठार, तीन जखमी; दुभाजकाला धडकल्यामुळे गाडीने पेट घेतला
२०१८ मध्ये एम टी अगरवाल रुग्णालयाच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. भाजप खासदार मनोज कोटक यांनी शनिवारी या रुग्णालयाला भेट दिली असता, महापालिका अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. रुग्णालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. एम टी अगरवाल सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते २०२४ च्या सुरुवातीला पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालयात कोणत्या सुविधा असणार
एम टी अगरवाल सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची इमारत १० मजली असून, ८ लाख वर्ग फुट इतक्या जागेवर बांधण्यात येणार आहे. या इमारतीत मॉड्युलर शस्त्रक्रियागृह, वैद्यकीय प्राणवायू, न्यूमेटिक ट्यूब यासारख्या आधुनिक आणि उच्च प्रतीच्या सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर हृदयशल्यचिकित्सा, मज्जातंतू चिकित्सा, मूत्रपिंड चिकित्सा, कान-नाक-घसा विभाग, नेत्र विभाग, वैद्यकीय विभाग असे विविध विभाग असणार आहेत. रुग्णालयातील ५०० खाटांपैकी ६० खाटा आयसीयू, एमआयसीयू आणि एनआयसीयूसाठी राखीव असतील. त्याचप्रमाणे रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआयची सुविधाही उपलब्ध असेल.