लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: यलोगेट पोलीस ठाण्याच्या ऑरेंज प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानाच्या रायफलचे मॅगझीन गायब झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहमीप्रमाणे शनिवारी यलोगेट येथे सीआयएसएफ जवान कर्तव्यावर होता. त्यावेळी अचानक एक मोटारगाडी गाडी प्रवेशद्वारातून आत आली. कर्तव्यावरील सीआयएसएफ जवानाने ही गाडी थांबवली आणि तो चालकाकडे चौकशी करू लागला. मात्र त्याच वेळी अचानक वाहन वेगाने सीएसएमटीच्या दिशेने निघून गेले. त्यावेळी जवानाची रायफल गाडीच्या दरवाजावर आपटली.
हेही वाचा… क्षयरुग्ण औषधांपासून वंचित; रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होण्याची भीती
गाडी निघून गेल्यानंतर गोळ्यांनी भरलेली मॅगझीन रायफलमध्ये नसल्याचे जवानाच्या लक्षात आले. सीएसएमटीच्या दिशेने वेगात गेलेल्या गाडीत मॅगझीन पडल्याचा संशय आहे. या वाहनाचा क्रमांक मिळाला असून सर्व प्रवेशद्वारावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात येत आहे. मुख्य नियंत्रण कक्ष व इतर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संबंधित गाडीचा आणि त्यातील व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. रायफलचे मॅगझीन गायब झाल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.