मुंबई : बाळांचे लसीकरण करताना अनेक मातांचा गोंधळ उडतो. लसीकरणाची तारख लक्षात राहत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाइलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मातांना लसीकरणाची इत्यंभूत माहिती व्हावी यासाठी ‘हॅलो व्हॅक्सी’ हे व्हॉट्स ॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे. सध्या हे चॅटबॉट इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध असून, लवकरच ते मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युएसएड, मोमेंटम रूटीन इम्युनायझेशन ट्रान्सफोर्मेशन ॲण्ड इक्विटी प्रकल्प यांच्या सहकार्याने ‘हॅलो व्हॅक्सी’ हे व्हाट्स ॲपचॅट बॉट तयार करण्यात आले आहे. बाळाच्या लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यासाठी आणि गैरसमज दूर करून लसीकरणामध्ये मदत करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. हे ॲप काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले असले तरी ते फक्त इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्येच आहे. ही माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होऊन हे ॲप मराठी भाषेमध्येही उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा >>>शिक्षा स्थगितीस न्यायालयाचा नकार; नववधूची हुंड्यासाठी हत्या; पतीसासूच्या जन्मठेपेच्या शिक्षेची केवळ नऊच वर्षे पूर्ण
‘हॅलो व्हॅक्सी’ व्हाॅट्स ॲप चॅटबॉट वापरण्यासाठी ८९२९ ८५०८५० या व्हाॅट्स ॲप क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवल्यानंतर विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात. त्यातील योग्य तो पर्याय निवडून लसीकरणाविषयी आवश्यक माहिती जाणून घेता येते. लसीकरणाविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न, बाळाचे लसीकरण वेळापत्रक, तसेच नकाशाद्वारे जवळील आरोग्य केंद्राची माहिती या चॅटबॉटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ‘हॅलो व्हॅक्सी’ व्हाॅट्स ॲप चॅटबॉट नागरिकांसाठी २४ तास लसीकरण मित्र बनेल, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.