मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी महानगरपालिकेने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक १ ची सोमवारी अंतर्गत पाहणी केली. या पाहणीसाठी जलाशयातील कप्पा १ पूर्ण रिक्त करून पुन्हा भरण्यात आला. त्यामुळे काही विभागातील नागरिकांना एक दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी महानगरपालिकेने आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीने ७ डिसेंबर रोजी जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी केली होती. त्यानंतर आज सोमवारी सकाळी ८ ते १० या कालावधीत जलाशयामधील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी केली. यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक १ रिक्त करण्यात आला होता. तज्ज्ञ समितीच्या भेटीचा शेवटचा टप्पा आज पार पडला. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेतील सात अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार; रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२३’ प्रदान

‘ए’, ‘सी’, ‘डी’ विभागातील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे

या पाहणीसाठी जलाशयाचा कप्पा रिक्त करण्यात आल्याने शहर विभागात काही परिसरात १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. त्यामध्ये चर्चगेट, कुलाबा, गिरगाव, ताडदेव, ग्रॅन्ट रोड या विभागांचा समावेश होता. जलाशयातील कप्पा १ पूर्ण रिक्त करून पुन्हा भरण्यात आला. त्यामुळे या विभागातील नागरिकांना एक दिवस (२४ तास) गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेने केली आहे.

हेही वाचा – म्हाडातील १४०० कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच

पार्श्वभूमी काय

संपूर्ण दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चिघळला आहे. १३६ वर्षे जुने हे जलाशय १८८७ साली हॅंगिंग गार्डन म्हणजे फिरोजशाह मेहता उद्यानाच्या खाली बांधण्यात आले होते. मात्र या जलाशयाची पुनर्बांधणी केल्यास ३८९ झाडे बाधित होणार आहेत. तसेच उद्यानही सात वर्षे बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे या उद्यानाच्या पुनर्बांधणीला येथील रहिवाशांनी व पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे या जलाशयाची पुनर्बांधणी करायची की दुरुस्ती करता येईल, असेही पर्याय चर्चेत येऊ लागले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री आणि दक्षिण मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नागरिकांची बैठकही बोलावली होती. तसेच नागरिकांची एक समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र त्यातून काही तोडगा न निघाल्यामुळे पालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात एक पुनर्विलोकन समिती स्थापन केली. या समितीमध्ये आयआयटीच्या संचालकांनी नियुक्त केलेले तीन प्राध्यापक, महापालिका अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The malabar hill reservoir was inspected by a committee of experts citizens of south mumbai should filter and boil water to drink mumbai print news ssb