मल्याळम भाषेला आता ‘अभिजात भाषा’ म्हणून दर्जा मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले असून मराठी भाषेला हा दर्जा कधी मिळणार? असा प्रश्न मराठीप्रेमी मंडळींकडून उपस्थित केला जात आहे. मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून तसा प्रस्तावच अद्याप राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सादर झालेला नाही.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून राज्य शासनाने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीला पहिल्यांदा ३१ जुलै २०१२ त्यानंतर ३१ जानेवारी २०१३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ३१ मे किंवा मराठी भाषेला हा दर्जा मिळेपर्यंत ही समिती काम करणार आहे.
मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर या समितीचे अध्यक्ष प्रा. पठारे यांच्याशी संपर्क साधला असता ‘लोकसत्ता’शी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी एकदा मल्याळम भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याबाबतचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या वेळी तो मंजूर झाला. मल्याळम भाषेला हा दर्जा मिळाला म्हणून आता मराठी भाषेला असा दर्जा मिळण्यात काही अडचण येईल, असे वाटत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून नेमलेल्या समितीने याबाबतचा सर्वकष प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव सुमारे १०० पानांचा असून तो मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन येत्या तीन ते चार दिवसात आम्ही तयार केलेला हा प्रस्ताव त्यांना सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री तो केंद्र शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवतील.
जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा ही १३ व्या क्रमांकावर आहे. जगातील ९ कोटींहून अधिक व्यक्ती मराठी भाषा बोलतात.
मल्याळमला ‘अभिजात भाषे’चा दर्जा, मराठीला कधी?
मल्याळम भाषेला आता ‘अभिजात भाषा’ म्हणून दर्जा मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले असून मराठी भाषेला हा दर्जा कधी मिळणार? असा प्रश्न मराठीप्रेमी मंडळींकडून उपस्थित केला जात आहे. मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
First published on: 24-05-2013 at 04:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The malayalam language to get the status elite language