गेल्या आठवडय़ाप्रमाणेच या शुक्रवारीही पुन्हा एकदा एकाच वेळी चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘अनुमती’, पु. ल. देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला ‘चांदी’, ‘योद्धा’ आणि ‘छबू पळाली सासरला’ अशा चार चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन हिंदी आणि एक इंग्रजी चित्रपटही प्रदर्शित होतोय. त्यामुळे चित्रपटगृहे मिळविण्यासाठी यावेळीही बरीच रस्सीखेच झाली आहे. यामध्ये ‘योद्धा’ या मराठी चित्रपटाला मुंबईतील एकही एकपडदा तसेच मल्टिप्लेक्स चित्रपटगृह मिळू शकले नाही. त्यासाठी आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.
‘अनुमती’ हा चित्रपट यापूर्वीच ३१ मेला प्रदर्शित केला जाणार होता.
परंतु, त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आणि आता तो शुक्रवारी प्रदर्शित होतोय. चार मराठी चित्रपट असल्यामुळे निश्चितच गल्लापेटीवर प्रत्येक चित्रपटाला थोडाफार फटका बसणार आहे, अस योद्धा चित्रपटाचे एक निर्माते मच्छिंद्र धुमाळ यांनी सांगितले.