लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशांतर्गत आघाडीवर ‘ब्लू-चिप’ माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने बुधवारी प्रमुख निर्देशांक नकारात्मक पातळीवर स्थिरावले. अत्यंत अस्थिर हालचाल राहिलेल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर २८.२१ अंशांनी घसरून ७५,९३९.१८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात त्याने ७६,३३८.५८ पातळीचा उच्चांक आणि ७५,५८१.३८ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२.४० अंशांची किरकोळ घसरण झाली आणि तो २२,९३२.९० पातळीवर बंद झाला.
भांडवली बाजारात निवडक कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीही बुधवारी दिसून आली. परदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीमुळे बाजारातील गतिमानतेवर परिणाम झाला. अमेरिकेकडून संभाव्य कर लादण्याबाबत आणि मध्यवर्ती बँकेकडून अपेक्षित व्याजदर कपातीतील विलंबाबद्दल चिंता कायम आहे. तिसऱ्या तिमाहीतील ‘जीडीपी’मध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने बाजारातील भावना आशावादी आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस प्रत्येकी २ टक्क्यांहून अधिक घसरले. त्यापाठोपाठ हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, सन फार्मा, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र आणि टेक महिंद्रचे समभाग देखील नकारात्मक पातळीवर स्थिरावले. मात्र अस्थिर बाजार परिस्थितीमध्ये झोमॅटोचे समभाग सुमारे ५ टक्क्यांनी वधारले. लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि कोटक महिंद्र बँकेचे समभाग देखील तेजीसह बंद झाले.
सेन्सेक्स ७५,९३९.१८ – २८.२१ (-०.०४%)
निफ्टी २२,९३२.९० – १२.४० (-०.०५%)
डॉलर ८६.९६ —
तेल ७६.३३ ०.६५ टक्के