मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागात शुक्रवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी बरसल्या. दक्षिण मुंबईतील काही परिसरात आणि विशेषतः मध्य उपनगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पावसाची नोंद झाली. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत सरी कोसळल्या. तरीदेखील, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी, मुंबईत पावसाबाबात अजूनतरी हवामान विभागाने कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही.
पूर्वमोसमी पाऊस?
मुंबईत शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उन्हाचा तडाखाही कमी होता. यामुळे उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री कांजूरमार्ग, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पनवेल भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे रात्री वातावरणात हलकासा गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी पावसाचा अंदाज वर्तवला नव्हता. हा पूर्वमोसमी पाऊस असून एप्रिल ते मे या कालावधीत पूर्वमोसमी पाऊस अनेक भागात पडतो.
कारण काय?
गरम हवा वर जाऊन थंड होते, त्यामुळे वाफेचे संक्षेपण होऊन पावसाचे थेंब तयार होतात. याचबरोबर वातावरणात पुरेशी वाफ तयार झाली असेल तरीही पाऊस पडतो. पण केवळ ढगाळ वातावरण असल्यामुळे हमखास पाऊस पडेलच असे नाही.
पूर्वमोसमी पाऊस आणि मोसमी पाऊस
* पूर्वमोसमी पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसात ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू होतो, काही वेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
* पूर्वमोसमी पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो.मोसमी पावसात ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे-पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
* पूर्वमोसमी पाऊस सहसा गडगडाटीअसतो. मोसमी पाऊस संततधार, बऱ्याचदा संथ आणि शांतपणे येतो.
उष्णतेच्या लाटेनंतर गारपीट
किनारपट्टी भाग वगळता राज्याच्या इतर भागात तापमान ४० अंशापार गेले आहे. विदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने ४५ अंशाच्या पुढे तापमान नोंदले जात आहे. यामुळे गेले दोन ते तीन दिवस या भागात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. आता शनिवारी चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर बीड, परभणी, सोलापूर, सांगली , सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
राज्यातही हजेरी
शुक्रवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. तर, काही भागात गारपिटीची नोंद झाली. कोल्हापूरातील हातकणंगले, सांगलीतील कसबेडिग्रज, जत येथे प्रत्येकी १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.