मुंबई : पुढील चार दिवस मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरण असेल. तसेच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यांतही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा जाणवू लागला होता. उकाड्याने मुंबईकर हैराण झाले होते. मात्र अधूनमधून होत असलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण असेल, तसेच पावसाच्या हलका सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईत ऑगस्ट महिन्यात कुलाबा केंद्रात सरासरी ४८२.१ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात सरासरी ५६६.४ मिमी सरासरी पाऊस पडणे अपेक्षित असते. १ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत कुलाबा केंद्रात सरासरी २८४.७मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात सरासरी ३७८ मिमी पावसाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावर सरासरीपेक्षा अनुक्रमे १९७.४ मिमी आणि १८८.४ मिमी पाऊस कमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, महिनाअखेर मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यातील पावसाची सरासरी गाठणे अशक्य आहे. राज्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर काही भागात ऊन – पावसाचा लपंडाव सुरू आहे. सध्या गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र आणि कच्छपासून आग्नेय भागात बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. तसेच दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. विदर्भ, मराठवाडा आणि सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The meteorological department has predicted light rain in mumbai print news amy