मुंबई: मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान तापमानात वाढ झाली आहे. संपूर्ण डिसेंबर महिना थंडीची प्रतिक्षा करण्यात गेला आता जानेवारी महिन्यातही ही प्रतिक्षा कायम राहणार का असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडी काहीशी कमी झाली आहे. मात्र, मुंबईत पावसाची शक्यता नसल्याने जानेवारी महिन्यात गारठा पडेल अशी अपेक्षा होती. दरम्यान, सोमवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात २२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
हेही वाचा… कुलाब्यात चाळीची संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू
सरासरीपेक्षा दोन्ही केंद्रावरील किमान तापमान हे जास्त आहे. शनिवारी हंगामातील सर्वात कमी किमान तापमान सांताक्रूझ येथे १७.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. त्यामुळे थंडी पडायला सुरुवात झाली आहे असा दिलासा मुंबईकरांना मिळाला होता.