मुंबई: राज्यभरात जोरदार पाऊस कोसळत असताना मुंबई, ठाणे आणि पुण्यात मात्र पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यासह या तिन्ही शहरातील सर्वपक्षीय आमदारांनी बुधवारी पाण्यासाठी टोहो फोडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

त्यावर पुण्यात आवश्यकतेपेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जात असून पाण्याच्या असमान वाटपातून निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी समान पाणीवाटपाची योजना राबविली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर मुंबई, ठाण्यातील पाणी प्रश्नावर शुक्रवारी बैठक घेण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली.

मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. भाजपाचे आशिष शेलार यांनी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मुंबईतील पाणीटंचाईकडे सभागृहाचे लक्ष वेधले. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दोन तासही पाणी मिळत नाही. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात २४ तास पाणी पुरवठ्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला, पण तो पुर्ण अपयशी ठरला. मुंबईच्या सगळ्याच भागात पाणीटंचाईच्या तक्रारी असल्याचे शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याबाबतच्या मुद्यावर अखेर पडदा, आयोगाला आरोपांबाबत १० जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मुंबईतील इतर आमदारांनीही शेलार यांच्या भूमिकेला पाठींबा दिला देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. ठाण्यातही अनेक भागात पाणीचंटाईचा प्रश्न गंभीर असल्याची तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली. कळवा-मुंब्रा भागात व्हॉल्वमन याला हाताशी ज्या भागात मते वाढवायची आहेत, त्या भागात पाणी वाढविले जाते. तर विरोधी मतदारांच्या भागात नागरिकांना पाणी मिळू नये याठीही प्रयत्न केले जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आपल्या कुलाबा मतदार संघात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणी पुरवठ्याची माहिती संबधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई-ठाण्यातील पाणी प्रश्नावर शुक्रवारी आमदार, महापालिका आयुक्त आणि संबंधित मंत्री यांची बैठक आपल्या दालनात घेण्यात येईल, अशी घोषणा केली.

पुण्यातील आमदारांचीही पाण्यासाठी टाहो

मुंबईप्रमाणेच पुण्यातील आमदारांनीही पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याची तसेच पाणी टंचाई असलेल्या भागात मोफत टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली. रवींद्र धंगेकर, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, भिमराव तपकीर, अशोक पवार, महेश लांडगे आदी सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून पुण्यातील पाणी प्रश्नावरुन आक्रमक भूमिका घेत वाढीव पाणी देण्याची मागणी केली.

राज्यात गृहनिर्माण प्रकल्प उभारतांना पाणी आणि मलनिस्सारणाची जबाबदारी पालिका विकासकावर टाकते तर विकासक लोकांवर टाकतो आणि स्वत: मोकळा होतो. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाची व्यवस्था ही विकासकाची जबाबदारी असून ती रहिवाशांवर टाकता येणार नाही. याबाबत नगरविकास विभागाच्या माध्यमातून रेरा प्राधिकरणाला कळविण्यात येईल आणि रहिवशांची फसवणूक रोखली जाईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

समान पाणी वाटपाची योजना

पुण्याला ७२ लाख लोकसंख्येसाठी प्रती माणसी १५० लिटर या मापदंडानुसार १२.८२ टीएमसी पाणी देणे आवश्यक असताना पुण्यात आजमितीस जवळपास दुप्पट म्हणजेच २०.७८ टीएमसी पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र शहरातील काही भागात पाणी टंचाई असून पाण्याची गळती आहे. त्यामुळेच शहरात समान पाणी वाटपाची योजना राबविली जात असून त्याचे काही भागात ४० टक्के काम झाले आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर २० टक्के पाण्याची बचत होईल. त्याचा वापर अन्य भागासाठी केला जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले.