कर्नाटकमधील भटकळ गावातील झरर मंझिलच्या परिसरात राहणाऱ्यांना आपण यासिनला शेवटचे कधी पाहिले होते, याची पुसटशी आठवण नाही. वैयक्तिक वाद आणि मतभेदांमुळे वडिलांचा ‘रेडिमेड गारमेंट’ उद्योग सोडून बाहेर पडल्यानंतर काही वर्षांपूर्वी तो दुबईत दिसला होता, असे यासिनची आई रेहाना व त्याचे काका सांगतात. पण गेली पाच वर्षे भारतातील सगळ्या सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेला यासिन भटकळ अखेर जाळ्यात सापडला. मुंबईसह देशभरातील अनेक स्फोट मालिकांमागील सूत्रधार असलेला यासिन हा आधुनिक दहशतवादाचा चेहरा मानला जातो. त्याच्या अटकेने देशातील अनेक दहशतवादी कारवायांची उकल होणे शक्य होणार आहे…
मुजाहिदीनमध्ये प्रवेश
२००८मध्ये पुणे आणि मंगळूर येथून अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून पहिल्यांदा यासिन भटकळ याचे नाव पुढे आले. भारतातील मुस्लीम समाजातील उच्चशिक्षित तरुणांना धार्मिक उपदेशांचे डोस पाजून दहशतवादाकडे वळवण्यात येत असल्याच्या सुरुवातीच्या काही उदाहरणांत यासिनचा समावेश होऊ शकतो.१९८३ साली जन्मलेल्या यासिनचे खरे नाव अहमद झरर सिद्दीबाप्पा असे आहे. येथील अंजुमनहमी ए मुस्लिमिन या शाळेतून शिकलेल्या भटकळची प्रशिक्षित अभियंता आणि स्फोटकतज्ज्ञ अशी ओळख इंडियन मुजाहिदीनमध्ये आहे. युनानी वैद्यकीय व्यवसाय सोडून इस्लामी प्रसारक बनलेल्या इकबाल इस्माइल शाहबंद्री आणि त्याचा भाऊ रियाझ इस्माईल यांच्या प्रभावाखाली यासिनचा इंडियन मुजाहिदीनमध्ये प्रवेश झाला.
भारताचा ‘मोस्ट वाँटेड’
गुंडगिरीच्या वाटेने दहशतवादाकडे वळलेला इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमिर रझा खान याचा विश्वासू सहकारी अशी ओळख यासिनला मिळाली तेव्हा तो अवघा २१ वर्षांचा होता. कर्नाटकातील समुद्रकिनाऱ्याला पोहोचलेली स्फोटके व देशविघातक साहित्य २००४ साली देशभरात पसरवण्यात भटकळची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. उत्तर कर्नाटकातील विठ्ठलमक्की आणि हक्कलमाने या भागांतून इंडियन मुजाहिदीनच्या देशभरातील प्रशिक्षण केंद्रांत बॉम्बचा पुरवठा करण्यापासून भटकळ दहशतवादी कारवायांत सक्रिय झाल्याचा अंदाज आहे. गुजरातमध्ये झालेल्या २००२च्या दंगलींनंतर आमिर रझा खान याने यासिनसारख्या अनेक उच्चशिक्षित मुस्लीम तरुणांना लष्कर ए तय्यबाच्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांत पाठवून घातपाती कारवायांसाठी तयार केले. तेथून बाहेर पडलेला यासिन भटकळ हा भारतातील अनेक घातपाती कारवायांचा मुख्य सूत्रधार बनला…
स्फोटांआधी हजर
आजघडीला इंडियन मुजाहिदीनचा सहभाग असलेल्या सर्व दहशतवादी कारवायांमध्ये यासिनची मुख्य भूमिका असल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील जर्मन बेकरीजवळ २०१० साली झालेल्या स्फोटांच्या काही मिनिटे आधी  तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात यासिन भटकळ दिसून आला. त्यानंतर झालेल्या सखोल तपासात, यासिन हा प्रत्येक वेळी दहशतवादी हल्ला घडवण्याच्या ठिकाणी आढळून आल्याने त्याच्यावरील आरोपांना पुष्टी मिळाली. पण, खबऱ्यांचे प्रचंड मोठे जाळे असल्याने प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही.
२००६ मध्ये मुंबईतील लोकल गाडय़ांमध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी तसेच बंगळूरूतील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी यासिन भटकळ हा आरोपी आहे. याशिवाय या वर्षीच हैदराबाद आणि दिलसुखनगर या ठिकाणी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत तो संशयित आरोपी आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) यादीतील ‘मोस्ट वॉन्टेड’ अतिरेकी असलेला यासिन भटकळ याच्यावर देशभरात अनेक ठिकाणी दहशतवादी कारवायांतील सहभागांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दहा लाख रुपयांचे इनामही जाहीर झाले होते.
भटकळचा सहभाग असलेल्या प्रमुख घातपाती कारवाया
* २५ जुलै २००८ बंगळुरू स्फोट :  काही मिनिटांच्या अंतरांनी झालेल्या नऊ स्फोटांमध्ये दोन ठार २० जखमी.
* २६ जुलै २००८ अहमदाबाद : अवघ्या ७० मिनिटांच्या अवधीत झालेल्या २१ स्फोटांत ५६ ठार, २००हून अधिक जखमी. पुढील तीन दिवसांत सुरत शहरांतून २३ बॉम्ब ताब्यात.
* १३ सप्टेंबर २००८ दिल्ली :  सायंकाळी सहानंतर पाच वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या स्फोटांत ३० ठार व १००हून अधिक जखमी.
* १३ डिसेंबर २००८ जयपूर : सुमारे पंधरा मिनिटांच्या अंतराने झालेल्या ९ स्फोटांत ६३ हून अधिक ठार, २१६ जखमी.
* १३ फेब्रुवारी २०१० पुणे : कोरेगावर पार्कजवळील जर्मन बेकरीबाहेर झालेल्या स्फोटांत १७ ठार, ६०हून अधिक जखमी. मृतांत दोन सुदानी व एका इराणी विद्यार्थ्यांसह एका इटालियन महिलेचा समावेश.
* ७ डिसेंबर २०१० वाराणसी :  दशाश्वमेध घाटाच्या शेजारी असलेल्या शीतला घाटावर सायंकाळच्या आरतीदरम्यान स्फोट. एका दोन वर्षीय मुलीचा मृत्यू व ४० जखमी.
* १३ जुलै २०११ मुंबई  : ओपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर या भागांत झालेल्या स्फोटांत २६ ठार. १३० जखमी.
गरम डोक्याचा भटकळ..
यासीन भटकळ हा अतिशय तापट, संतापी आणि गरम डोक्याचा होता. त्याच्या या भडक स्वभावाचे एक उदाहरण पोलिसांनी सांगितले. पुण्यात बॉम्ब ठेवण्यासाठी यासीन आपल्या साथीदारासह गेला होता. त्यावेळी उद्यानातील सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले आणि उद्यानात थांबू नका असे सांगून जायला सांगितले. सुरक्षा रक्षकाने केलेला हा अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्याचा पारा चढला. आपल्याकडील रिव्हॉल्वर काढून तो सुरक्षा रक्षकाला मारणार होता. पण त्याच्या साथीदाराने त्याला वेळीच अडवले. आपल्याला बॉम्ब प्लान्ट करायचाय, आताच रखवालदारावर हल्ला केला, तर ही योजना फसेल, असे या साथीदाराने सांगितल्यावर संतापाने थरथरतच यासीनने रिव्हॉल्वर पुन्हा कमरेत खोचले, असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नामकरण असे झाले
इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना दोन टप्प्यात कार्यरत होती.  २००८ पूर्वी ती वेगळ्या प्रकारे सक्रीय होती तर २००८ नंतर त्यांनी नाव धारण करून अभिनव पद्धतीने आपले काम सुरू केले. पूर्वी या संघटनेला नाव नव्हते. जुलै २००८ मध्ये त्यांनी संघटनेला नाव दिले. आतिक अमिन, सादीक शेख आणि रियाज भटकळ हे तिघे अंधेरीच्या मॅक्डोनल्ड मध्ये गप्पा मारत बसले होते. आपल्या संघटनेला काय नाव द्यावे याबाबत या सर्वांमध्ये खूप खल सुरू होता. प्रदीर्घ विचारविनियही झाला, आणि ‘इसाबा’ हे अरेबिक नाव ठेवायचे, असे त्यांनी सुरुवातीला ठरवले. इसाबाचा अर्थ बटालियन. पण हे नावही लोकांना समजणार नाही, म्हणून ते बाद केले. तसाच ‘फुरकान’ हा शब्दही निकालात काढण्यात आला. अखेर त्यांनी इंडियन मुजाहिदीन हे नाव नक्की केले