मुंबई : पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयामधील शवविच्छेदन केंद्राची व शवागराची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगर खनिज फाऊंडेशनच्या निधीतून दुरुस्तीची ही कामे करण्यात येणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या वाढल्यामुळे शवागारावर ताण वाढला होता. त्यामुळे या शवागारांची व शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील शवागरे व शवविच्छेदन केंद्र राज्य सरकारमार्फत चालवली जातात. या शवागरांच्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबई उपनगरीय खनिज या विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. या विभागाने प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. मुंबई उपनगरांतील चार शवविच्छेदन केंद्रे व चार शवागरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याची हमी विभागाने दिली आहे. त्यात राजावाडी रुग्णालयातील शवागराचा समावेश आहे.
हेही वाचा >>> तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : अभिनेता शिझान खान याची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत. चार रुग्णालयातील शवागर व शवविच्छेदन केंद्रासाठी सर्व करांसह एक कोटी २४ लाख रुपये अंदाजित खर्च आहे. मात्र मुंबई उपनगर जिल्हा खनिज क्षेत्र प्रतिष्ठान यांनी अद्याप मुंबई महानगरपालिकेला निधी उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे हा निधी उपलब्ध केल्यानंतरच संबंधित कंत्राटदारांना या कामाचे कार्यादेश देण्यात येणार आहेत.