तब्बल १७०० कोटींचा खर्च आणि पाच वर्षांपासूनची गैरसोय लादूनही मुंबईकरांच्या स्वप्नातील मोनोरेल प्रत्यक्षात धावण्याची कोणतीही चिन्हे अजूनही दृष्टीपथात  नाहीत. कामांत चालढकल, निष्काळजीपणा, तकलादू साहित्याचा वापर आणि संभाव्य धोके टाळण्याच्या परिपूर्ण यंत्रणांचा अभाव यांमुळे मोनो रेलच्या वेळेत सुरू होण्याची शक्यता नाहीच, परंतु या सेवेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सुरुवातीपासूनच वेळापत्रक कोलमडून पडलेल्या मोनो रेलच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचे आयुक्त व सहआयुक्त यांनी ३० ऑगस्ट रोजी लार्सन अँड टूब्रो स्कोमी इंजिनीयरिंग या कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मोनोच्या कामातील दिरंगाईसोबत कामाचा दर्जा व सुरक्षितता या दोन्हींबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. अननुभवी आणि अर्धवट प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा करून कामे रेटल्यामुळे मोनो रेलच्या चाचण्यादेखील पुरत्या फसल्या आहेत.
कंत्राटदारांनी तांत्रिक कौशल्य किंवा अनुभवांची देवाणघेवाण न करताच काम रेटून नेल्याबद्दलही या बैठकीत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र नापसंती नोंदविली. मोनो रेल कधीपासून कार्यान्वित होणार त्याची निश्चित तारीख सांगा, अन्यथा, पुढील कालावधीसाठी दंड आकारणे भाग पडेल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
मोनो रेलच्या पॅनलचे दरवाजे तुटून पडले त्या वेळी सुदैवाने कुणी आसपास नव्हते. मात्र, अशा प्रकारांमुळे ही सेवा नंतर तरी सुरक्षित असेल का, याबद्दल साशंकता आहे, अशा शब्दांत प्राधिकरणाचे आयुक्त यु.पी.एस मदान यांनी नाराजी व्यक्त केली. तर, यापुढे एखादा जरी अपघात किंवा दुर्घटना घडली, तरी कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा  सह आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला. लार्सन टूब्रो स्कोमी इंजिनीयरिंगच्या व्यवस्थापनानेही या बाबी मान्य केल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी क्वालालंपूरच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्याचेही त्यांनी मान्य केले असून मोनो कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही अवधी मिळावा अशी विनंतीही केली आहे.
मोनोचे ‘प्रगतीपुस्तक’
* एकही स्थानक पूर्ण नाही.
* गाडय़ा उपलब्ध नाहीत.
* चाचण्यांचे वेळापत्रकही कोलमडले.
* सध्या असलेल्या गाडय़ांपैकी काहींचे दरवाजे बंद होत नाहीत.
* शीतकरण यंत्रणेची झाकणे तुटून पडतात.
* ऑइल पंपदेखील निकामी आहेत.
* इतर अनेक तांत्रिक त्रुटी.

Story img Loader