लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून नाल्यांमधून १०० टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. नाल्यांमधून ३१ मेपर्यंत गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र नियोजित कालावधीपूर्वीच एक आठवडा आधी ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी मुंबईत नालेसफाई करण्यात येते. यंदा पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून एकूण ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. गुरुवार, २५ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार नाल्यांतून ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे १००.५१ टक्के गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र ठरवलेल्या मुदतीच्या एक आठवड्यापूर्वीच गाळ काढण्याचे उद्दिष्ट गाठण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
हेही वाचा… मुंबईः हिऱ्यांची बेकायदेशीर आयात केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाला अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होतो. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाल्यात कचरा टाकू नये
यंदा ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तसेच, गाळ काढण्याच्या कामाला ६ मार्च २०२३ रोजी सुरुवात करण्यात आली होती. यापुढेही नाल्यांतून अधिक गाळ काढण्याचे काम सुरू राहील, अशी माहिती उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. दरम्यान, गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
आतापर्यंत काढण्यात आलेला गाळ
- शहर विभाग – ३५ हजार ७५६ मेट्रिक टन – ९४.२३ टक्के
- पूर्व उपनगरे – १ लाख १९ हजार ३५९ मेट्रिक टन – १०१.४२ टक्के
- पश्चिम उपनगरे – १ लाख ९४ हजार ६२२ मेट्रिक टन – १००.३६ टक्के
- मिठी नदी – १ लाख ९५ हजार ५६६ मेट्रिक टन – ९०.४७ टक्के
- लहान नाले – ३ लाख ८५ हजार ६४४ मेट्रिक टन – १०५.४७ टक्के
- महामार्गांलगतचे नाले – ५३ हजार ९७७ मेट्रिक टन – १११.२९ टक्के
नाल्यांमधून काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी आतापर्यंत वाहनांच्या ५१ हजार ४९० फेऱ्याया झाल्या आहेत.
छायाचित्रे, व्हिडिओ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध
मुंबई महानगरपालिकेच्या https://swd.mcgm.gov.in या संकेतस्थळावर नाल्यांतून काढलेल्या गाळाची आकडेवारी, माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आदी उपलब्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ५४ हजार ५०० हून अधिक छायाचित्रे, ७२ हजार ३०० पेक्षा अधिक व्हिडिओ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.