वरळी येथील आदर्श नगर स्पोर्ट्स क्लब मैदानाची लवकरच सुधारणा करण्यात येणार आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या अखत्यारीतील या मैदानाची सुधारणा मुंबई महापालिकेतर्फे केली जाणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे.
गेल्या काही वर्षात वरळी परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील सत्तांतरांतर वरळीचे महत्त्व वाढले आहे. एरव्ही इतर प्राधिकरणाच्या हद्दीत सोयी सुविधा देताना हात आखडता घेणाऱ्या महापालिकेने वरळीतील एका म्हाडाच्या मैदानाचा विकास करण्याचे ठरवले आहे. या कामासाठी पालिका १ कोटी १८ लाख रुपये खर्च करणार आहे.
हेही वाचा >>>भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रांना आज सुरुवात, शिंदे-फडणवीस यांचा सहभाग
वरळी कोळीवाड्याला लागून असलेल्या या मैदानात सध्या कोणत्याच सोयी सुविधा नाहीत. मैदानातील पदपथ सुधारणे, जमिनीचा दर्जा सुधारणे, पावसाळ्यात मैदानात पाणी साचू नये म्हणून मैदानाखाली पर्जन्यजल वाहिन्या टाकणे अशा मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मैदानात व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी अशा प्रकारच्या खेळांसाठी सुविधा उभारण्यात येणार आहेत. मैदानात खुली व्यायामशाळा, विद्युत रोषणाई, मैदानाच्या परिघाभोवती जाळ्या बसवणे ही कामे देखील केली जाणार आहेत.