मतदार याद्यांमधील नावे वगळण्याबाबत विविध आरोप-प्रत्यारोप होत असले तरी दुबार नावे, घर बदलले किंवा मृत झालेल्यांची सुमारे ५७ लाख नावे राज्यातील मतदार याद्यांमधून वगळण्यात आली आहेत. मुंबई, नागपूर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांतील नावांवर मोठय़ा प्रमाणावर फुली पडली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दुबार नावे किंवा मृत व्यक्तींची नावे वगळावी, असा आदेश सर्व राज्यांना दिला आहे. यानुसारच मतदार याद्यांचा फेरआढावा घेताना नावांबाबत बारीक लक्ष घालण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मतदार याद्यांमधून विशिष्ट विभागांतील नावे वगळल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात येत असला तरी या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुबार नावे असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. ही सर्व नावे वगळण्यात आली आहेत. छायाचित्रासह मतदार याद्यांमध्ये नावे असलेली आठ लाख नावे दुबार नोंदणीमुळे वगळली गेली आहेत. नावे वगळली असली तरी काही तक्रारी असल्यास फेरनोंदणीची संधी मतदारांना उपलब्ध आहे.
मुंबई, ठाण्यात मोठय़ा प्रमाणावर दुबार नावे
वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये मुंबई आणि पुणे जिल्ह्यतील सर्वाधिक मतदारांचा समावेश आहे. मुंबई शहर (सुमारे सात लाख) तर मुंबई उपनगर जिल्’ाातील पाच लाख नावे वगळण्यात आली आहेत. पुणे जिल्हा (९ लाख), ठाणे (४ लाख ७८ हजार), उपराजधानी नागपूर (४ लाख ६४ हजार), नाशिक (सव्वा तीन लाख), सोलापूर (२ लाख ७५ हजार), जळगाव (दोन लाख), नगर (दोन लाख), औरंगाबाद (सव्वा लाख), सांगली (१ लाख १९ हजार), अमरावती (दीड लाख), लातूर (एक लाख), बीड (१लाख ३६ हजार), रायगड (१ लाख ७३ हजार), रत्नागिरी (७० हजार), सिंधुदुर्ग (१९ हजार), धुळे (८५ हजार), कोल्हापूर (५८ हजार) नावे वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक कमी म्हणजे १० हजार नावे ही वाशिम जिल्ह्यतून वगळण्यात आली आहेत.