मुंबई : गतवर्षी नीट (यूजी) परीक्षेतील गैरप्रकारामुळे झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर यंदा राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) योग्य काळजी घेतली आहे. नीट (यूजी) २०२५ परीक्षेमध्ये संशयास्पद बाबी आढळल्यास विद्यार्थ्यांना तातडीने तक्रार करता यावी, यासाठी एनटीएकडून स्वतंत्र व्यासपीठ सुरू केले आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार, खोटे दावे करून फसविण्याचा प्रयत्न करणारे घटक आढळल्यास त्यांना बळी न पडतात तातडीने त्याची तक्रार एनटीएच्या संकेतस्थळावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षी नीट (यूजी) प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली होती. पेपरफुटीबरोबरच कथित अनियमिततेमुळे एनटीएकडून यावेळी परीक्षा आयोजनात अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. नीट (यूजी) परीक्षेतील गैरव्यवहाराला प्रतिबंध करण्यासाठी एनटीएकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येणार आहे.
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून फसविण्याचा प्रकार काही असामाजिक घटकांकडून करण्यात येत असतो. याला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, तसेच याबाबत विद्यार्थ्यांना तातडीने तक्रार करता यावी यासाठी एनटीएकडून स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यंदा होणाऱ्या नीट परीक्षा साधारणपणे २३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक व दिशाभूल होऊ नये यासाठी एनटीएने कंबर कसली आहे.
तक्रार करता येणार
विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात येणाऱ्या तीन पद्धतींची माहिती एनटीएकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये समाजमाध्यम, विविध संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना नीट यूजीचा पेपर उपलब्ध करून देण्याबाबत दाखविण्यात येणारे आमिष, परीक्षेतील प्रश्न किंवा त्यातील माहिती सहज उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती आणि सरकारी अधिकारी किंवा एनटीएचे अधिकारी असल्याचे भासवून विद्यार्थांची फसवणूक करण्यात येते.
त्यामुळे परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेच्या दिवशी अशा प्रकारच्या व्यक्ती किंवा संकेतस्थळावर अशी माहिती आढळल्यास विद्यार्थ्यांना https://nta.ac.in किंवा https://neet.nta.ac.in. या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळांवर तातडीने तक्रार करता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भरावा लागणारा तक्रार अर्ज हा फारच सोपा असून, यामध्ये त्यांनी काय पाहिले, कुठे आणि केव्हा घटना घडली याचे वर्णन करायचे आहे.
तसेच त्याला दुजोरा देणारी फाईल संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान घडणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी म्हणजे ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संकेतस्थळावर देता येणार असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कायद्यात कठोर कारवाईची तरतूद
सार्वजनिक परीक्षांमधील अनुचित पद्धती दूर करणे, त्याला प्रतिबंध करणे आणि उमेदवारांचे भविष्य सुरक्षित करणे या उद्देशाने एनटीएकडून हा उपक्रम सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य साधनांचे प्रतिबंध) कायदा, २०२४ च्या अनुषंगाने राबविण्यात येत आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची तरतूद आहे.