लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंतच्या कालावधीत आयोजित ‘सेवा पखवाडा’ कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्य रक्त संक्रमण परिषदेने १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत स्वेच्छिक रक्तदान मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत रक्तपेढींच्या आवश्यकतेनुसार ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वेच्छेने विनामोबदला रक्तदान करणारे आणि जीवन वाचवणाऱ्या रक्तदानाबद्दल रक्तदात्यांचे आभार मानाणे, सुरक्षितता आणि गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्त आणि रक्त उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि नियमित रक्तदानाच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करावी यासाठी दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा… गौतमी पाटीलच्या मुंबईतल्या कार्यक्रमात राडा, ‘हे’ वर्तन करणाऱ्या तरुणाला गर्दीने चोपलं
आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेल्या सूचनेनुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने १७ सप्टेंबर ते २ ऑगस्टदरम्यान राज्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना सर्व रक्तपेढ्या, सरकारी रुग्णालयांचे प्रमुख आणि आरोग्य विभागाला दिले आहेत.