आधी भांडभांड भांडायचे आणि निवडणुका जवळ आल्यावर एकत्र यायचे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत नेहमीच अनुभवास येते. दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीतही आता झाले तेवढे बस झाले, निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र येण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे तर राष्ट्रवादीकडून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे सहभागी झाले होते. आघाडी कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला असला तरी काँग्रेस-राष्ट्रवादीत कटुता मोठय़ा प्रमाणावर आहे. मात्र औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान केले. यातून काँग्रेसचे सुभाष झांबड हे ७२ मतांनी विजयी झाले. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीने दिलेली साथ ही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने चांगली सुरुवात असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत जागा वाटपावरून कुरबुरी सुरू आहेत. जागावाटपाची चर्चा मुंबईत झाली पाहिजे, असा ठाकरे यांचा आग्रह आहे. मात्र ही चर्चा दिल्लीतच व्हावी, असा सर्वमान्य तोडगा प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत सुचविले.

Story img Loader