लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामधील सिटीस्कॅन यंत्र बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी सिटीस्कॅन केंद्रांमध्ये ही चाचणी करावी लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. मात्र आता नायर रुग्णालयातील रुग्णांची सिटीस्कॅनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नायर रुग्णालयामध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत नवीन सिटीस्कॅन यंत्र सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज साधारणपणे तीन – चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. यामधील काही रुग्णांना डॉक्टर सिटीस्कॅन करण्याचा सल्ला देतात. मात्र रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये किंवा खासगी सिटीस्कॅन केंद्रांमध्ये ही चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. मात्र महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षायादी असल्याने रुग्णांना सिटीस्कॅन चाचणी खासगी केंद्रात करावी लागते. परिणामी, रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो.

हेही वाचा… सत्यशोधनासाठी नव्या पद्धतीची गरज काय? खोटय़ा वृत्तांबाबतच्या कायदा दुरुस्तीबाबत उच्च न्यायालयाचा सवाल

नायर रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र बंद असल्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र रुग्णांचा हा त्रास आता लवकरच संपुष्टात येणार आहे. नायर रुग्णालयामध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत सिटीस्कॅन यंत्र बसविण्यात येणार आहे. सिटीस्कॅन यंत्र खरेदी संदर्भातील सर्व प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने पूर्ण केली असून संबंधित कंपनी सप्टेंबरअखेरपर्यंत रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र बसविणार आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली. यामुळे रुग्णांना होणारा त्रास लवकरच कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The new ct scan machine will be operational at nair hospital by the end of september mumbai print news dvr
Show comments