राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुरू असलेल्या सर्वेक्षणांतर्गत दररोज करोना चाचणी करण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत २७ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा- मुंबई : नागपाड्यात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
चीनमध्ये करोनाच्या सापडलेल्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांचेही २४ डिसेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून दोन टक्के प्रवाशांचे नमूने करोना चाचणीसाठी घेण्यात येत आहेत. त्यातील करोनाबाधित नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ५ लाख १५ हजार ५२६ इतके रुग्ण उतरले असून, त्यातील ११ हजार ७१८ रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली.
अद्यापपर्यंत २७ रुग्णांचे नमूने बाधित असल्याचे आढळले. त्यात मुंबईतील सात, पुण्यात तीन, नवी मुंबई, अमरावती, सांगलीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला. उर्वरित रुग्णांमध्ये पाच रुग्ण गुजरातमधील असून केरळ, उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी दोन आणि गोवा, तामिळनाडू, आसाम, ओडिसा व तेलंगणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.